Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › प्रचाराची रणधुमाळी समाप्त; उद्या मतदान

प्रचाराची रणधुमाळी समाप्त; उद्या मतदान

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 11:31PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी  थंडावल्या. आता बुधवारी (दि. 1)  तीनही शहरांत मतदान होणार आहे. शुक्रवारी, 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.  निवडणूक रिंगणातील 451 उमेदवारांचे  राजकीय भवितव्य त्या दिवशी ठरणार आहे.

प्रचार समारोपाच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून सभा, प्रभागनिहाय प्रचारफेर्‍यांचे आयोजन केले होते. भाजपने सभांना फाटा देत प्रभागनिहाय रॅलींनी प्रचाराचा समारोप केला. शिवसेनेशी मिरजेत सभेद्वारे, तर सांगली, कुपवाडमध्ये प्रचारफेर्‍यांद्वारे प्रचार संपविला. स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडीसह अपक्षांनीही व्यक्‍तिगत भेटीगाठींद्वारे प्रचाराची सांगता केली. 

महापालिकेच्या पाचव्या टर्मसाठी निवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी तसेच अपक्ष महाआघाडी आणि अपक्षांनी मैदानात उडी घेतली आहे. सर्वच पक्षांनी गेल्या महिन्याभरापासून  मुलाखती घेऊन उमेदवार निश्‍चिती प्रक्रिया पार पाडली. यातून सर्वच पक्षांत नाराजीही उफाळून आली. त्यामुळे अपक्ष महाआघाडीने सर्वांसमोर आव्हान उभे केले आहे. या सर्वांनी गेल्या महिन्याभरापासून प्रचाराचा धुरळा उठविला.

काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री नसीमखान, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, युवा नेते विशाल पाटील  यांनी भाजप-सेनेवर तोफा डागल्या. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अब्दुल सत्तार आदिंनी भाजप-शिवसेनेचा समाचार घेत प्रचाराचे रान तापविले होते. यासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री प्रतिक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, राष्ट्रवादीकडून शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील आदींनी मोर्चेबांधणी केली आहे. या आघाडीचा प्रचाराचा समारोप आज शहरात हर्षवर्धन पाटील, डॉ. विश्‍वजित कदम, विशाल पाटील  यांच्या सभांनी झाला. तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी जयंत पाटील यांनी काही भागात प्रचारफेरी काढून समारोप केला.

भाजपने जिल्ह्यातील सत्तेचे हे महत्त्वाची केंद्र ताब्यात घेण्यासाठी  अनेक महिन्यांपासून फिल्डिंग लावली होती. भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मोर्चेबांधणी केली होती. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनासाठी माजी उमपमहापौर शेखर इनामदार यांनी यासाठी व्यूहरचना ठरविली होती. सर्व म्हणजे 78 जागांवर उमेदवारही उभे केले. त्यांच्या प्रचारार्थ सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात सभा, व्यक्‍तिगत भेटीगाठी, संपर्क अभियानावर भर दिला होता. यासाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंधारण राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदींनीही सांगलीत येऊन तोफा डागल्या. भाजपच्यावतीने पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्‍तिगत भेटीगाठी, बैठकांद्वारे तर संजय पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी तीनही शहरात उमेदवारांच्या व्यक्‍तिगत प्रचारफेर्‍यांद्वारे भाजपच्या प्रचाराचा समारोप केला.

शिवसेनेने ताकदीने पहिल्यांदाच या निवडणूक  मैदानात उडी घेत 51 उमेदवार उभे केले. त्यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा सभांमधून समाचार घेत प्रचार केला. यासाठी प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभुते, आनंदराव पवार, शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने, जिल्हा संघटक दिगंबर जाधव आदींनी मोर्चेबांधणी केली आहे. सांगली, मिरजेत गजानन किर्तीकर, नितीन बानुगडे यांच्या उपस्थितीत प्रचारफेर्‍यांद्वारे समारोप झाला.

स्वाभिमानी आघाडीने  माजी आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्यासाठी नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांनी रविवारीच प्रचार रॅली व भव्य सभेद्वारे पक्षीय समारोप केला होता. जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यासह टीमनेही मैदानात उडी घेतली आहे. त्यांनीही 19 उमेदवार उभे करून त्यांच्या प्रचारार्थ रान तापविले. त्यांनीही भेटीगाठींद्वारे समारोप केला. लोकशाही आघाडी, अपक्ष पॅनेल तसेच अपक्षांनी व्यक्‍तिगत रॅलीद्वारे समारोप केला.

सायंकाळी 5.30 वाजता प्रचार थांबला. सर्वांच्या तोफा थंडावल्या. यानुसार आता खुला प्रचार थांबला आहे. बुधवारी एकूण 544 मतदान केंद्रांवर एकूण 451 उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी (दि. 31) सायंकाळपर्यंत सर्वच अधिकारी, कर्मचारी केंद्रांचा ताबा घेऊन यंत्रणा सज्ज ठेवतील. त्यानुसार बुधवारी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

असे करावे मतदान 

चारसदस्यीय पॅनेल पद्धतीने 78 सदस्यांसाठी 20 प्रभागांत ही निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण 18 प्रभागांत चार, तर सांगलीवाडी व मिरजेतील प्रभाग 20 मध्ये तीन सदस्यांसाठी  मतदान करायचे आहे. त्यानुसार तीनसदस्यीय प्रभागांसाठी तीन, तर चारसदस्यीय  प्रभागांत चार जणांना मतदान  करावे लागेल. त्याशिवाय, प्रक्रिया अपूर्ण होणार नाही. चार गटांत मतदान झाल्यानंतर बिपचा दीर्घ आवाज येईल. एका गटात एकच मतदान करता येईल. दुसरे चिन्ह दाबले, तरी क्लिक होणार नाही. प्रत्येक गटाच्या शेवटी ’नोटा’चा पर्याय असेल.