Thu, Aug 22, 2019 04:28होमपेज › Sangli › आयुक्‍तांनी तपासली कर्मचार्‍यांची ‘वर्कशीट’

आयुक्‍तांनी तपासली कर्मचार्‍यांची ‘वर्कशीट’

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:49PMसांगली : प्रतिनिधी

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत ‘मेमोरिडींग’ घेतले. त्यांनी अनपेक्षितपणे कर्मचार्‍यांची ‘वर्कशीट’ मागवून कामाच्या दररोजच्या नोंदीही तपासल्या. दरम्यान, कामकाज प्रभावीपणे करा. विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवा. हयगय केल्यास आढावा देण्यासाठी पुण्याला बोलावून घेतले जाईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेची सन 2016-17 ची वार्षिक तपासणी झाली होती. या तपासणीतील 36 मुद्यांवर डॉ. म्हैसेकर यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत ‘मेमोरिडींग’ घेतले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडील उपायुक्त (आस्थापना) श्री. लांगोरे, सहायक आयुक्त (चौकशी) रश्मी खांडेकर, सहायक आयुक्त (तपासणी) श्रीमती घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर यांनी ‘मेमोरिडींग’वेळी रँडमली काही खातेप्रमुखांना त्यांचा विभाग विचारून त्यांच्याकडील कर्मचार्‍यांची वर्कशीट तपासणीसाठी मागवून घेतली. वर्कशिट रोजच्या रोज लिहिल्या जातात का? कक्षअधिकारी, अधीक्षक या वर्कशिटची तपासणी करतात का, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

कर्मचारी वर्कशीटमध्ये कामाच्या दररोजच्या नोंदी असतात. गतिमान व पारदर्शी कारभाराचा पाया म्हणून ‘वर्कशीट’कडे पाहिले जाते. यंत्रणेचे मूळ कामकाज त्यातून प्रतिबिंबीत होत असते. त्यामुळे ‘वर्कशीट’च्या अचानक तपासणीतून डॉ. म्हैसेकर यांनी पवित्रा स्पष्ट केला. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या वर्कशीट तपासणीनंतर डॉ. म्हैसेकर यांनी समाधान व्यक्त केले. ‘माझे केवळ कामावरच लक्ष असेल. कामच विचारात घेतले जाईल. ज्यांचे काम कमी असेल त्यांना पुण्याला बैठकीला यावे लागेल’, असेही डॉ. म्हैसेकर यांनी अधिकार्‍यांना सांगितले.  

पंचायत समितींच्या बैठकांना उपस्थित रहा

पंचायत समितींच्या बैठकांना जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खातेप्रमुखाने उपस्थित राहिले पाहिजे. आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायतींना भेटी वाढविल्या पाहिजेत. विकास कामांनाही भेटी देऊन पाहणी केली पाहिजे, असे डॉ. म्हैसेकर यांनी अधिकार्‍यांना सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक

पुणे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले. केंद्र, राज्य शासनाच्या विकासाच्या योजना, कामांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा.  प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. ‘मेमोरिडींग’ सुरळीत पार पडले.