Mon, Apr 22, 2019 12:21होमपेज › Sangli › ‘सिव्हिल’च्या लिफ्टमध्ये रुग्णांसह कर्मचारी अडकले

‘सिव्हिल’च्या लिफ्टमध्ये रुग्णांसह कर्मचारी अडकले

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:07AMसांगली : प्रतिनिधी

येथील शासकीय रूग्णालयात (सिव्हील) नव्यानेच बसवलेल्या लिफ्टमध्ये सहा रूग्णांसह दोन कर्मचारी सुमारे अर्धातास अडकले होते. तांत्रिक विभागाच्या कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न करून त्यांची सुटका केली. दरम्यान ज्या कंपनीने महिनाभरापूर्वी ही लिफ्ट बसवली आहे, त्या कंपनीच्या तंत्रज्ञाने हात वर करत घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सिव्हीलच्या कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सहा रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी नेत्र विभागात लिफ्टने नेण्यात येत होते. यावेळी या रूग्णांसोबत एक अधिपरिचारिका व एक सेवक होते. तळ मजल्यावरून आठहीजण लिफ्टने जात असताना पहिल्या मजल्याजवळ आल्यानंतर लिफ्ट अचानक बंद पडली. यामुळे आतील रूग्णांसह सर्वांनीच आरडा-ओरडा सुरू केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रूग्णालयाच्या तांत्रिक विभागातील कर्मचार्‍यांना बोलावण्यात आले. 

या कर्मचार्‍यांनी तातडीने लिफ्ट बसविणार्‍या कंपनीच्या तंत्रज्ञाला घटनेची माहिती दिली. तसेच सिव्हीलमध्ये येण्यास सांगितले. मात्र त्याने या कर्मचार्‍यांनाच उद्धट उत्तरे दिली तसेच येण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर सिव्हीलच्या कर्मचार्‍यांनीच सुमारे अर्धातास अथक प्रयत्न करून लिफ्टमध्ये अडकलेल्या आठहीजणांची सुटका केली. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर रूग्णांसह अधिपरिचारिकेला अश्रू अनावर झाले होते. नवीन लिफ्ट बसवून ती सातत्याने बंद पडत असल्याने तसेच संबंधित कंपनीचा तंत्रज्ञ न आल्याने सिव्हीलमधील कर्मचार्‍यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

महिन्यात सात ते आठवेळा लिफ्ट पडली बंद...

सिव्हील हॉस्पीटलमधील दोन लिफ्ट कालबाह्य झाल्याने महिनाभरापूर्वीच टेंडरपद्धतीने दोन लिफ्ट नव्याने बसवण्यात आल्या आहेत. एका कंपनीने लिफ्ट बसवण्याचे काम घेतले होते. लिफ्ट बसवल्यानंतर अतिदक्षता विभागाजवळ असलेली लिफ्ट एकदा रविवारी बंद पडली. त्यावेळी सिव्हीलच्या कर्मचार्‍यांना ती सुरू न झाल्याने कंपनीच्या तंत्रज्ञानाला बोलावण्यात आले. मात्र त्यादिवशी तो आला नाही. सोमवारी येऊन त्याने लिफ्ट सुरू केली. या दोन्ही लिफ्ट बसवल्यापासून आतापर्यंत सात ते आठवेळा दोन्ही लिफ्ट बंद पडल्या होत्या. त्यामुळे लिफ्ट बसवणार्‍या कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अत्यवस्थ रूग्ण नेताना लिफ्ट बंद पडून त्याचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा प्रश्‍न सिव्हीलमधील कर्मचार्‍यांकडून विचारला जात आहे.