Fri, Apr 19, 2019 12:29होमपेज › Sangli › .. तर कर्मचारी आंदोलनात अधिकारी महासंघही

.. तर कर्मचारी आंदोलनात अधिकारी महासंघही

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:13PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

राज्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने मार्ग न काढल्यास कर्मचारी संघटनांच्या आंदोलनात अधिकारीही सहभागी होतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे. 

शिक्षणाचे कंपनीकरण, शासकीय व निमशासकीय नोकर्‍यांचे कंत्राटीकरण, खासगीकरण, कर्मचारी कपात यासह केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी व जनताविरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचारी व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. राज्यभरातील संघटना एकत्र येऊन शासन धोरणांविरोधात लढ्याचे रणशिंग फुंकणार आहेत. सांगलीत विविध संघटनांच्या बैठकीत हा निर्धार केला आहे. राज्यस्तरीय संघटनांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विविध कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना तसेच अधिकारी महासंघाची दि. 6 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे प्राथमिक चर्चा होणार आहे. दि. 9 रोजी राज्यातील सर्व संघटनांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाचा पवित्रा स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण खरमाटे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, दादासाहेब पाटील यांनी त्यास दुजोरा दिलेला आहे. 

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याकडे लक्ष वेधले आहे. कर्मचारी कपातीला विरोध, रिक्‍त जागा तातडीने भरणे, सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा, कंत्राटीकरणास विरोध व अन्य मागण्यांवर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी अधिकारी महासंघाने केलेली आहे. शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाबाबत कर्मचारी संघटना जो निर्णय घेतील त्या आंदोलनात राज्यातील सर्व अधिकारीही हिरीरिने सहभागी होतील, असे महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे.