Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Sangli › इस्लामपूर आगारातील कर्मचारी निलंबित

इस्लामपूर आगारातील कर्मचारी निलंबित

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 11:53PMइस्लामपूर : वार्ताहर

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट इस्लामपूर आगारातील कर्मचारी शरद महादेव जंगम (रा. येडेनिपाणी, ता. वाळवा) यांना चांगलीच महागात पडली आहे. सकाळी ही पोस्ट व्हायरल होताच सायंकाळी जंगम यांच्या हातात परिवहन खात्याचे निलंबनाचे पत्र मिळाले. 

शरद जंगम यांनी शुक्रवारी मंंत्री रावते यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, ‘महामंडळाचे अध्यक्ष श्री. रावते यांना खुले आव्हान देतो की, एकदा कामगारांसमोर या आणि आपली भूमिका स्पष्ट करा. हे महामंडळ जर नीट चालवता येत नसेल आणि कामगारांना त्यांची हक्‍काची वेतनवाढ देता येत नसेल तर... चालते व्हा... कामगारशक्‍तीचा अंत बघू नका... आणखी एक गोष्ट आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरणारे नाही... लिहिला की फेकला..’

जंगम यांची ही पोस्ट फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर झपाट्याने व्हायरल झाली. त्यामुळे शनिवारी सायंकाळी विभागीय वाहतूक अधीक्षक यांचा जंगम यांच्या नावे निलंबनाचा आदेश आला. या आदेशात म्हटले आहे की, जंगम यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आणि तो महामंडळाच्या हितास बाधक असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांसाठी लागू असलेल्या शिस्त व कार्यपद्धतीमधील तरतुदीनुसार मिळालेल्या प्रदत्त अधिकारान्वये जंगम यांना पुढील आदेश मिळेपर्यंत चौकशीसाठी निलंबित करण्यात येत आहे.