Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Sangli › शासकीय रिक्त जागा तातडीने भरा

शासकीय रिक्त जागा तातडीने भरा

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 8:13PMसांगली : प्रतिनिधी

राज्यात भरती अभावी शासकीय अधिकार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. एका कर्मचार्‍याला पाचजणांचे अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

ते म्हणाले, दरवर्षी 3 टक्के पदे रिक्त होत आहेत. शासनाने गेल्या अनेक वर्षापासून रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे याचा ताण हा शासकीय कर्मचार्‍यांवर पडत आहे. सध्या एक कर्मचार्‍याला पाच जणांचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. सध्या 1 लाख 80 हजार पदे रिक्त आहेत. शासनाने 72 हजार पदे भरणार, अशी घोषणा केलेली आहे. परंतु त्यावर अंमलबजावणी केलेली नाही. त्याचबरोबर नियुक्तीचे वयही वाढविले आहे. खुल्या जागांसाठी 38  व मागासवर्गीयांसाठी 43 अशी वयोमर्यादा केली आहे. त्यामुळे नोकरीस लागलेला कर्मचारी लवकरच निवृत्त होत असतो. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर दरवर्षी भरती झाल्यास अन्य कर्मचार्‍यांवरील कामाचा ताणही हलका होणार आहे.   राज्यातील कर्मचार्‍यांच्या तक्रारी वाढत आहेत. यासंदर्भात वारंवार मुख्यमंत्र्यांशी आम्ही महासंघाच्यावतीने चर्चा केलेली आहे. परंतु आम्हाला आश्‍वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही. त्यामुळे तातडीने रिक्त जागा भरण्यासाठी आम्ही आग्रह धरणार असल्याचे ते म्हणाले.