Fri, Aug 23, 2019 14:28होमपेज › Sangli › देशात आणीबाणीसदृश्य अराजक

देशात आणीबाणीसदृश्य अराजक

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 11:26PMसांगली : प्रतिनिधी

देशात आणीबाणीसदृश्य अराजक माजले आहे. भाजप सरकारने व्यक्‍ती स्वातंत्र्यावर बंधने आणली आहेत. मत स्वातंत्र्य दडपले जात आहे. विकासाच्या राजकारणाची भाषा करून सत्ता मिळवलेल्या भाजपने जाती-जातीत भांडणे लावून द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. देशातील जनता हे मान्य करणार नाही. सन 1977 प्रमाणे देशात सत्ताबदल घडेल, असे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पवार म्हणाले, आणीबाणीतील मुस्कटदाबी जनतेने मान्य केली नाही. कोणाचीही मनमानी जनता खपवून घेत नाही. वेळ आल्यावर योग्य ठिकाणी बटन दाबते. दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविला. मात्र लगेचच दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने आम आदमी पार्टीला प्रचंड पाठबळ दिले. अशी अनेक उदाहरणे आहेत. देशात 1975 ते 77 या कालावधीत आणीबाणी होती. आताही देशात आणीबाणी सदृश्य स्थिती आहे. दरम्यान, भीमा-कोरेगाव दंगलीला राज्यातील सरकारच जबाबदार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुखच डल्ले मारत फिरत आहेत. नोटाबंदीच्या काळात ‘लोकमंगल’च्या नोटा सापडल्या. तुरीचा घोटाळा झाला. सोलापुरात अग्नीशमनच्या जागेवर मंत्री देशमुख यांनी डल्ला मारला. राज्यातील 36 पैकी 25 जिल्हे साखर कारखानदारीशी, ऊस पिकाशी संबंधित आहेत. पण साखरेला दर नाही. त्यामुळे उसाला दर नाही. त्यावर निर्यात वगैरे उपाययोजना काहीच केली जात नाही. कारखान्यांच्या सहविज निर्मिती प्रकल्पातून तयार होणार्‍या विजेचे दर कमी केले आहेत. त्याचा थेट फटका ऊस दरावर झाला आहे. सहकारमंत्री देशमुख मात्र ढिम्म आहेत. 

काकडी, वांगी : 79 पैसे भाव

शेतीमालाला भाव नाही. काकडी, वांगी किलोला 79 पैसे आणि 69 पैसे  दराने विकावी लागत आहेत.  कोबीला भाव नाही म्हणून उभ्या पिकात रोटाव्हेटर घालण्याची वेळ शेतकर्‍यावर आली. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, अशी टीका पवार यांनी केली. 

चहा घोटाळ्यात विरोधक नाहीत

‘मुख्यमंत्र्यांचा चहा विरोधकही प्याले आहेत. चहावरील खर्च हा घोटाळा असेल तर त्यात विरोधकही सहभागी आहेत’, असा पलटवार भाजपने केला आहे. त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा चहा प्यायला विरोधक कधीच गेलेनाहीत. विधीमंडळ अधिवेशनात तर आम्ही चहापानावर नेहमीच बहिष्कार टाकलेला आहे. 

निवडणूक प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप

सुनील तटकरे म्हणाले, भाजप सरकारचा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप आहे. प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून विरोधकांना निष्प्रभ करण्याचा उद्योगही केला जातो. थेट सरपंच, थेट नगराध्यक्ष निवडणुकीतील बदल भाजपने त्यांच्या सोयीप्रमाणे केले. एस.टी.च्या खासगीकरणाला तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील रिक्‍त पदे रद्दला राष्ट्रवादीचा विरोध आहे. 

‘ओटीएस’: निलंगेकरांवर मेहरनजर; 

तटकरे म्हणाले, भाजपचे मंत्री संभाजी निलंगेकर यांच्या उद्योगाला ‘ओटीएस’अंतर्गत 53 कोटींची मेहरनजर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ‘ओटीस’मध्ये मात्र दीड लाखावरील दीड-दोन लाखांसाठी कर्जमाफीचा लाभ दिला जात नाही. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे.राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, विष्णू माने, राहूल पवार, भरत देशमुख,सागर घोडके, पद्माकर जगदाळे उपस्थित होते. 

Tags : Sangli, Emergency scenario, country