Sat, Jan 25, 2020 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › वॉन्लेसवाडीत सभामंडपाचे अतिक्रमण जमीनदोस्त 

वॉन्लेसवाडीत सभामंडपाचे अतिक्रमण जमीनदोस्त 

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 11:35PMकुपवाड : वार्ताहर 

महापालिका प्रभाग समिती तीनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने  वॉन्लेसवाडीतील संत बाळूमामा मंदिराच्या समोरील सभामंडपाचे अतिक्रमण बुधवारी काढले. यावेळी अज्ञातांकडून सहायक आयुक्‍त जी. टी. भिसे यांच्या वाहनावर दगड फेकून काच फोडण्यात आली.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, संत बाळूमामा सेवाभावी संस्थेच्या वतीने वान्लेसवाडीत खासगी जागेवर बाळूमामा मंदिर बांधण्यात आले आहे. या संस्थेकडून व परिसरातील भाविकांकडून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमासाठी जागा कमी पडत असल्याने भाविकांकडून लगतच्या महापालिकेच्या ताब्यातील चार गुंठे खुल्या भूखंडावर महाप्रसाद, पूजा-अर्चा यासह विविध उपक्रमांसाठी सभामंडप बांधण्यात आला होता.

खुल्या भुखंडावर अतिक्रमण  करून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाबाबत सुधार समितीचे पदाधिकारी व नागरिकांनी महापालिकेडे तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने यापूर्वी   अतिक्रमण काढून घेण्याबाबत संबंधित पुजारी यांना नोटीस बजावली होती. मात्र, याप्रकरणी कोणतीही कार्यवाही  झाली नाही.

त्यामुळे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भिसे, अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे, अभियंता एन. डी.दळवी, अल्ताफ मकानदार आदिंच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी दुपारी सभामंडपाचे अतिक्रमण जेसीबीने काढून टाकले.

महापालिका पथकाकडून   अचानक ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी संतापलेल्या भाविक महिलांंनी भिसे यांना घेराव घातला. तसेच अज्ञात भाविकांनी भिसे यांच्या वाहनावर( एम.एच.10-एन-0025) दगड फेकून काच फोडली. भाविक   व अतिक्रमण पथकाचे अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.  

विश्रामबाग पोलिस ठाण्याकडून बंदोबस्त मागविण्यात आला होता. कारवाई वेळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.