Tue, Jun 25, 2019 21:41होमपेज › Sangli › पात्र-अपात्रता ठरविण्यास ५ फेब्रुवारी ‘डेडलाईन’ 

पात्र-अपात्रता ठरविण्यास ५ फेब्रुवारी ‘डेडलाईन’ 

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:26PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 41 हजार शेतकर्‍यांची माहिती तपासून पात्र-अपात्र ठरविण्यास शासनाने 5 फेब्रुवारी डेडलाईन दिली आहे. या मुदतीत तालुकास्तरीय समितीला गतीने तपासणी करून पात्र, अपात्र यादी शासनाला पाठवावी लागणार आहे. पात्र शेतकर्‍यांची यादी (ग्रीन लिस्ट) शासन प्रसिद्ध करणार आहे. 

कर्जमाफी योजनेसंदर्भात प्रधान सचिव एस. एस. संधु यांनी  सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.  जिल्हा उपनिबंधक, बँकांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ‘ओटीएस’साठी पात्र-अपात्र ठरविण्यास दि. 5 फेब्रुवारी अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यस्तरावर पात्र-अपात्रता निश्‍चित न झालेल्या 40 हजार 515 हजार शेतकर्‍यांचा ‘डाटा’ दि. 15 जानेवारी रोजी शहानिशा करण्यासाठी जिल्हा बँकेकडे आला आहे. शाखास्तरावर बँकेचे अधिकारी व लेखापरीक्षक यांच्या माध्यमातून माहितीची शहानिशा व त्रुटी दुरुस्तीनंतर तालुकास्तरीय समिती पात्र-अपात्रतेबाबत निर्णय घेणार आहे. त्यास प्रधान सचिव संधु यांनी दि. 5 फेब्रुवारी अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर पात्र-अपात्र शेतकर्‍यांची माहिती शासनाला सादर होईल. त्यानंतर लाभ दिला जाईल.