Mon, May 20, 2019 09:02होमपेज › Sangli › सरकारच्या फसवेगिरी विरोधात एल्गार 

सरकारच्या फसवेगिरी विरोधात एल्गार 

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:36PMइस्लामपूर : प्रतिनिधी

सरकार उज्वला व अस्मिता योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिला व तरुणींची फसवणूक करीत आहे. आम्ही या योजनांच्या फसवेगिरीविरुद्ध एल्गार करणार आहोत, अशी  घोषणा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी  येथे बोलताना केली. 

भाजपाचे आमदार राम कदम यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली, म्हणजे मेहरबानी केलेली नाही, असा टोलाही त्यांनी दिला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांशी  संवाद करताना त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील, तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर, माजी नगराध्यक्षा अरूणादेवी पाटील, सुनीता देशमाने, कमल पाटील उपस्थित होते.

 चित्रा वाघ म्हणाल्या, उज्ज्वला योजनेतून सिलेंडर दिला जातो. तेव्हा रॉकेल बंद आणि आठशेच्यावर गेलेला सिलेंडर परवडत नाही, अशी अवस्था भगिनींची झाली आहे.  समाजातील असंघटित महिलांसह शिक्षिका, डॉक्टर, वकील आदि विविध क्षेत्रातील महिलांना पक्षात सामावून घ्या. 

जयंत पाटील म्हणाले, महिलांनी,  कार्यकर्त्यानी बूथ समित्यामध्ये सहभागी व्हावे. रिलायन्ससह परदेशात जादा गॅस निघत असल्याने सरकार मोफत सिलेंडर वाटत आहे. मात्र पूर्वी 375  ला मिळणारा सिलेंडर 800 रूपयांवर गेला आहे.  छाया पाटील, रोझा किणीकर, उषा मोरे-पंडीत, अलका माने,  आशिफा बागवान,अबोली पाटील, किरण सावंत यांची भाषणे केली. कमल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक  केले.  सुनीता देशमाने यांनी आभार मानले.