Tue, Jun 18, 2019 21:20होमपेज › Sangli › अकरावी प्रवेश प्रक्रिया २५ जूनपासून सुरू

अकरावी प्रवेश प्रक्रिया २५ जूनपासून सुरू

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 9:41PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया दि. 25 जूनपासून सुरू होत आहे. प्रवेशासाठी शाळांना डोनेशन घेता येणार नाही. विनाअनुदानित शाळांनी शैक्षणिक शुल्क ठरविताना नफेखोरी करू नये. भरमसाठ शुल्क आकारू नये. शैक्षणिक शुल्कबाबत शाळेसंदर्भात तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांना काढले आहे. 

जिल्ह्यात दहावी परीक्षेत 38 हजार 478 नियमित व 650 रिपीटर असे एकूण 39 हजार 128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी व पालकांना आता अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, संयुक्त, इतर, डिप्लोमा, ‘आयटीआय’कडील प्रवेश क्षमता 50 हजार 694 विद्यार्थी इतकी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जादा असली तरी ठराविक उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये आणि ठराविक अभ्यासक्रमांनाच जास्त मागणी असते. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा लागते. 

शिक्षणाधिकारी चोथे म्हणाले, अकरावी प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थी अथवा पालकांकडून डोनेशन घेऊ नये. विनाअनुदानित शाळांनी शैक्षणिक शुल्क ठरविताना नफेखोरी करू नये. भरमसाठ शुल्क आकारू नये. शैक्षणिक शुल्क निश्‍चित करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. शुल्क निश्‍चितीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी हवी. फी संदर्भात शाळेबाबत तक्रारी येणार नाहीत, याची संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक/प्राचार्यांना तसे कळविले जात आहे. 

अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दि. 15 जून रोजी सकाळी 11 वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्याल य येथे मुख्याध्यापक/प्राचार्यांची बैठक बोलविली आहे.