होमपेज › Sangli › पूर्व नियोजनामुळेच निवडणूक शांततेत

पूर्व नियोजनामुळेच निवडणूक शांततेत

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:22PMसांगली : अभिजित बसुगडे

यंदाची महापालिकेची निवडणूक कमालीच्या शांततेत पार पडल्याचे दिसून आले. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर केलेले पूर्व नियोजन, कारवाईची कडक अंमलबजावणी यामुळेच ही निवडणूक अनुचित प्रकाराशिवाय पार पडली. पोलिसांनी महिनाभर रोज केलेली नाकाबंदी, हद्दपारी, प्रवेशबंदी, कोम्बिग ऑपरेशन, ऑल आऊट ऑपरेशनचेच हे यश असल्याचे दिसून आले. 

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी तातडीने अधिकार्‍यांची बैठक घेऊन या निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन केले होते. तीनही शहरातील बारा ठिकाणी रोज रात्री आठ ते बारा या वेळेत नाकाबंदी केली जात होती. त्याशिवाय तीनही शहरात विविध गुन्हे दाखल असलेले तसेच शहराजवळील गावांमधील गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रवेशबंदीची कारवाई केली. 

मतदानाच्या आधी आठ दिवस तीनही शहरात सातत्याने कोम्बिग ऑपरेशन केले जात होते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर स्थानबद्धता, हद्दपारी अशा कारवाया केल्या जात होत्या. त्याशिवाय ऑल आऊट ऑपरेशनही राबवले जात होते. दिवसाचे चोवीस तास पोलिस रस्त्यावर दिसत होते. यामुळे  गडबड करणार्‍यांना चांगलाच चाप बसला होता. 

मतदानादिवशी गोंधळ झालेल्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होत होता. यामुळे  गोंधळ करणार्‍यांना चांगलाच चाप बसत होता.  मतदानाच्या आधी दोन दिवस सर्व बीअर बार, हॉटेल, ढाबे, पानपट्ट्या रात्री दहा वाजता कटाक्षाने बंद करण्यात येत होत्या. त्याशिवाय पोलिसांची पथके रात्रभर शहरात गस्त घालत असल्याने उमेदवारांना ‘रात्रीचा खेळ’ करण्याची संधीच मिळाली नाही.     
मांटे खुनानंतर आवळला चाप

दारूच्या बिलावरून वाद झाल्यानंतर वाहतूक पोलिस समाधान मांटे यांचा कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्स हॉटेलमध्ये खून करण्यात आला.  खुनाच्या घटनेनंतर रात्रीच्या बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत त्याचा चांगला परिणाम दिसून आला. 

सहा महिन्यांपासून केली होती तयारी...

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी  पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारीपासून तयारी सुरू केली होती. सर्वात आधी त्यांनी मटका बुकी, जुगार्‍यांची हद्दपारी केली. तीनही शहरातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर हद्दपारी, स्थानबद्धता, मोक्का  कारवाईला वेग दिला. त्यामुळे  गुन्हेगारी टोळ्या निवडणुकीपूर्वीच हद्दपार झाल्या होत्या. प्रमुख टोळ्यांवरील कारवाईनंतर त्यांनी किरकोळ गुन्हे नोंद असणार्‍यांवर लक्ष केंद्रित केले. ऐन निवडणुकीत  प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेकांना घरातील उमेदवार असूनही शहरात येता आले नाही. या तयारीचे फलित म्हणूनच निवडणूक शांततेत झाली.

राज्य उत्पादन शुल्कचेही योगदान...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर थोडे उशिरा जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्कनेही महिनाभरात जोरदार कारवाई केली. अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी चार विशेष भरारी पथकांची नेमणूक केली. पोलिसांच्या सहाय्याने या पथकाने महापालिका क्षेत्रात अवैध दारू विक्री, वाहतूक करणार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. त्याशिवाय महापालिका क्षेत्रासह आसपासच्या गावांत संपूर्ण तीन दिवस ड्राय डे घोषित करून अधीक्षक शेडगे यांनी नवीन संकल्पना पुढे आणली. यापूर्वी फक्त सायंकाळपर्यंतच होणारे ड्राय पूर्ण दिवस करण्यात आले. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही अवैध दारू वाहतुकीची मोटार अडवून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारू साठा जप्त केला.