Mon, Mar 25, 2019 17:57होमपेज › Sangli › मिरजेत निवडणूक निकालाबाबत पैजा

मिरजेत निवडणूक निकालाबाबत पैजा

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:39PMमिरज : प्रतिनिधी
अत्यंत चुरशीने झालेल्या महापालिका निवडणूक निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. क्रॉस वोटिंगमुळे निवडणूक निकाल काय लागणार, यावर प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांनी पैजा लावल्या आहेत. शहरात महापालिकेचे सहा प्रभाग आहेत. सर्वच प्रभागात भाजप, काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात चुरशीने लढत झाली आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी लढत प्रतिष्ठेची केली होती. आमदार सुरेश खाडे यांनीही महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने सर्वच प्रभागात अटीतटीची लढत झाली. 

प्रभाग क्र. 3 मध्ये आमदार खाडे यांचे स्वीयसहाय्यक मोहन वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे आणि शिवसेनेच्या श्‍वेता गवाणे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली होती. या प्रभागात भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली. 

प्रभाग क्र. 4 मध्ये भाजप आणि अनिलभाऊ  कुलकर्णी यांच्या अपक्ष आघाडीमध्ये लढत चांगलीच रंगली होती. या प्रभागात शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांमुळे कोणाला फायदा होतो आणि कोणाला फटका बसतो याची चर्चा आहे. तसेच या प्रभागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले नव्हते. त्याचा फायदा अपक्ष आघाडीला होण्याची शक्यता आहे. या आघाडीच्या पराभवासाठी भाजपनेही चांगली कंबर कसली आहे.

प्रभाग क्र. 5 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली आहे. या लढतींमध्ये माजी महापौर इद्रिस नायकवडी आणि माजी महापौर किशोर जामदार यांचे चिरंजीव करण जामदार यांच्यात कोण बाजी मारणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

प्रभाग क्र. 6 व 7 मध्येही कुरघोडीच्या राजकारणाचा काय परिणाम काय होतो हे पहावे लागणार आहे. प्रभाग क्र. 7 मध्ये माजी महापौर किशोर जामदार यांनी आपली लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. सर्वाधिक चुरशीची लढत प्रभाग क्र. 20 मध्ये पहावयास मिळाली. या प्रभागात भाजप जिंकणार, की राष्ट्रवादी काँगे्रस बाजी मारणार याकडे राजकीय नेत्यांच्याही नजरा लागल्या आहेत.

महापालिका निवडणुकीत प्रथमच एमआयएमने 8 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदउद्दीन ओवेसी यांची मिरजेत सभा घेण्यात आली. या सभेचा प्रत्येक प्रभागातील कोणत्या उमेदवारावर काय परिणाम होतो आणि या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येतात, याकडेही सार्‍यांचे लक्ष आहे.