Sun, Apr 21, 2019 00:06होमपेज › Sangli › प्रभागरचनेतून रंगणार सत्तेचा सारिपाट

प्रभागरचनेतून रंगणार सत्तेचा सारिपाट

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 8:26PMसांगली : अमृत चौगुले

महापालिकेच्या निवडणुकीचा सत्तेचा सारीपाट प्रभागरचनेतूनच रंगणार आहे. त्यासाठी आतापर्यंत झालेल्या निवडणुका पाहता निवडणूक आयोगाने विलंबच झाला आहे. मात्र आता चार सदस्यीय व 20 हजारावर मतदारांचे प्रभाग आहेत. त्यामुळे एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून सत्ता खेचण्याचे मोठे आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह विविध आघाड्यांना पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने आता सर्व मदार प्रभागरचनेवर राहणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

आगामी लोकसभा नसली तरी किमान सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची महापालिका निवडणूक ही नांदी असणार आहे, हे उघड आहे.  यादृष्टीने आता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती मैदानात उतरणार आहे, हे उघड आहे. सध्या विविध सामाजिक प्रश्‍नांवर कार्यरत असणार्‍या सर्वपक्षीय कृती समितीनेही दबावगट निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका महापालिका निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यादृष्टीने राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. मात्र याला खर्‍या अर्थाने मुहूर्त महापालिकेच्या प्रभागरचनेपासून होणार आहे. प्रशासकीय पातळीवर प्रारूप प्रभागरचना पद्धतीने तयार झाल्याची चर्चा जोरात आहे. अर्थात शासन पातळीवर त्यावर शिक्कामोर्तब झाला  नसला तरी भाजपला सोयीस्कर प्रभागरचना होत असल्याची चर्चाही खुद्द काँग्रेसमधूनच बोलून दाखविली जात आहे. अर्थात या जर-तरच्याच चर्चा आहेत.

वास्तविक मनपा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडूनच प्रभागरचनेच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा आहे. एप्रिलअखेर आचारसंहितेचा कार्यकाल व आतापर्यंत  पार पडलेल्या निवडणुका पाहता आतापर्यंत प्रभागरचनेला प्रारंभ होणे आवश्यक होते. आता आठवड्याभरात आदेश होतील, अशी चर्चा आहे. त्यानुसार प्रभागरचना होऊन शासनामार्फत त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर त्यावर हरकती, सूचना होऊन अंतिम शिक्कामोर्तब होईल. त्याचदरम्यान प्रभागवार आरक्षणांचा फैसला होईल. त्यादृष्टीने सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

अर्थात चार सदस्यांपैकी एक खुला प्रवर्ग, महिला खुला प्रवर्ग हे निश्‍चित आहे. एकूण 11 सदस्यांचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण असेल. यामध्ये 50 टक्के महिला असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गही 16 सदस्य असणार आहेत. एकूण सदस्य खुला प्रवर्गातील 63 सदस्य असतील. एकूणच या सर्वांचा ताळमेळ 80 मधून 50 टक्के महिला आहेत.  यामुळे प्रभागरचनेतून तुल्यबळ उमेदवार आणि प्रभागनिहाय आरक्षण या सर्वांचा ताळमेळ घालून उमेदवारांची रस्सीखेच रंगणार आहे.  यादृष्टीनेही सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. अर्थात प्रभागरचना  यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यावरच सत्तेचे गणित आहे.