Mon, Jun 17, 2019 18:28होमपेज › Sangli › काँग्रेसकडून घोरपडे, संजय पाटील, मदनभाऊ गटाला संधी

काँग्रेसकडून घोरपडे, संजय पाटील, मदनभाऊ गटाला संधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवार  व उपसमित्यांवरील सभापती निवडीत काँग्रेसने माजीमंत्री अजितराव घोरपडे गट, भाजपचे खासदार संजय पाटील गट, मदनभाऊ गट आणि ‘जनसुरारज्य’ला संधी दिली. मिरज बाजार आवारच्या सभापतीपदी मदनभाऊ गटाचे वसंतराव गायकवाड, कवठेमहांकाळच्या सभापतीपदी खासदार गटाचे दादासाहेब कोळेकर, जत  बाजार आवारच्या सभापती पदी ‘जनसुराज्य’चे देयगोंडा बिरादार, फळे व भाजीपाला मार्केटच्या सभापती पदी घोरपडे समर्थक दीपक शिंदे यांची निवड झाली आहे. 

बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीनंतर दुय्यम बाजार आवार व उपसमित्यांवरील सभापती निवडी रखडल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये बाजार समिती संचालक मंडळाची जत येथे बैठक झाली होती. या बैठकीतच दुय्यम बाजार आवार व उपसमित्यांवरील सभापती निवडी होणार होत्या. मात्र इच्छुकांची संख्या अधिक असल्याने एकमत होत नव्हते. त्यामुळे निवडी जाहीर करण्यास तब्बल एक महिन्याचा विलंब झाला.  सोमवारी संचालक मंडळ बैठकीत निवडी जाहीर झाल्या. अध्यक्षस्थानी दिनकर पाटील होते. 

गायकवाड यांची नाराजी दूर

बाजार समिती सभापती पदाच्या शर्यतीत वसंतराव गायकवाड होते, मात्र दिनकर पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे गायकवाड नाराज होते. मिरज दुय्यम बाजार आवारच्या सभापती पदी  पुन्हा निवड करून त्यांची नाराजी दूर केली आहे. मिरज आवारच्या सभापती पदासाठी घोरपडे समर्थक दीपक शिंदे हेही प्रबळ इच्छुक होते. शिंदे यांची विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केटच्या सभापतीपदी निवड करून घोरपडे गटालाही सत्तेबरोबर ठेवले आहे.

खासदार गटाला पुन्हा संधी

कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवारच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे अजित बनसोडे व भाजपचे खासदार पाटील समर्थक दादासाहेब कोळेकर प्रबळ दावेदार होते. अखेर कोळेकर यांनी पुन्हा सभापतीपदी बाजी मारली आहे. बनसोडे यांना ‘पुढल्या वेळी’चे आश्‍वासन दिल्याचे समजते. 

दुसरे बिरादार ‘इन’

जत दुय्यम बाजार आवारच्या सभापतीपदी जनसुराज्यचे देयगोंडा बिरादार यांची निवड झाली आहे. बिरादार हे ‘जनसुराज्य’चे असले तरी त्यांचे काँग्रेसचे नेते सावंत यांच्याशी सख्य वाढल्याची चर्चा आहे. सुगलाबाई बिरादार यांचे संचालकपद  रद्दच्या पार्श्‍वभूमीवर देयगोंडा बिरादार यांना सभापतीपद देऊन बेरजेचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. जत बाजार आवारच्या सभापतीपदासाठी अभिजीत चव्हाण, रामगोंडा संती हेही इच्छुक होते. चव्हाण यांना डिसेंबरमध्ये होणार्‍या सांगली बाजार समिती सभापती निवडीत संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. 

कदम यांचा ‘ग्रीन सिग्नल’; सभापती निवडी जाहीर

सत्ताधारी गटातील नेते विक्रम सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, जयश्री पाटील, खासदार संजय पाटील यांच्याशी तसेच माजीमंत्री अजितराव घोरपडे यांचे प्रतिनिधी जीवन पाटील यांच्याशी चर्चा केली. सभापती पदांच्या नावाला कदम यांच्याकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच संचालकांसमोर नावे जाहीर केली. 

सांगली बाजार समितीत ‘मिळून सारेजण’

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने भाजपचे खासदार संजय पाटील गट, माजीमंत्री अजितराव घोरपडे गट, मदनभाऊ गट, जनसुराज्यला सत्तेत संधी दिली आहे. बाजार समितीतील सत्तेत ‘मिळून सारेजण’ सहभागी झाले आहेत. 

 

Tags : sangli, sangli news, Sangli Agricultural Produce Market Committee, Ajitrao Ghorpade, Sanjay Patil, Madanbhau Patil, 


  •