Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Sangli › निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात!

निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात!

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:33PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील  हातघाईला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाल्याचे दिसत आहे. यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार असल्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या हाताशी असेल नसेल ती सगळी यंत्रणा कामाला लावल्याचे दिसत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शहर सुधार समितीचे मिळून 227 उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय 224 अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे बहुसंख्य सगळ्या प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होत आहेत. अखेरच्या टप्प्यात बहुसंख्य सगळ्या प्रभागांमध्ये एकाचवेळी प्रचाराचा धुरळा उठलेला दिसत आहे. सकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचारसभा तर दुपारी भाजप उमेदवारांची प्रचार रॅली तर संध्याकाळी आणखी कुणाची प्रचारसभा यामुळे सगळे वातावरण राजकीयदृष्टा ढवळून निघालेले दिसत आहे. 

बहुसंख्य सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचाराची सुत्रे आपल्या हाती घेतल्याचे दिसत आहे. आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ.विश्‍वजित कदम, जयश्रीताई पाटील यांच्या प्रचार दौर्‍यांना भल्या सकाळपासून सुरुवात होत आहे. नेत्यांनी आपल्या प्रभागात प्रचारासाठी आलेच पाहिजे, असा बहुसंख्य सगळ्या उमेदवारांचा आग्रह असल्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नेत्यांना उसंत घेणे मुश्किल झाले आहे. सर्वच पक्षांच्यावतीने अखेरच्या टप्प्यात राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभा आणि रॅलींचे नियोजन करण्याची तयारी सुरू  आहे.
निवडणुकीत इतकी चुरस दिसत आहे की, उमेदवारांनी आपल्या इष्टमित्रांसह पै-पाहुण्यांनासुध्दा प्रचाराच्या कामाला लावल्याचे दिसत आहे. शासकीय नोकरदार मंडळी तर आपल्या पै-पाहुण्यांच्या प्रचारासाठी थेट रजा टाकूनच हजर झाल्याचे दिसत आहेत.  

निवडणुुकीच्या अखेरच्या टप्प्यात  निवडणुकीतील खर्‍या हालचालींना  वेग आल्याचे दिसत आहे. शासकीय निवडणूक यंत्रणेचा सगळीकडे ‘वॉच’ असला तरी काही प्रभागांमध्ये व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा आहे. अत्यंत चुरशीच्या काही प्रभागांमध्ये एकेका मतासाठी जोरदार चुरस सुरू आहे. त्यामुळे उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रात्रंदिवस जागरूक राहून  विरोधकांच्या  प्रचारावरही लक्ष ठेवून आहेत.

जाने कहाँ गये वो दिन!

जिल्ह्यातील वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याचे नेतृत्व केलेले आहे. त्यानंतरच्या कालावधीत स्व. आर. आर. पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. मदन पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख हे नेतेही जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करताना दिसत होते. मात्र आबा, पतंगराव आणि मदनभाऊंच्या पश्‍चात जिल्ह्यामध्ये नेतृत्वाची एक पोकळी जाणवून येत आहे. आजमितीस सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीतील भाजपच्या नेतृत्वाची कमान कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि  सोलापूरचे असलेले  सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख हे सांभाळत आहेत. तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगलीतील काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सोपविल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मात्र या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत.