Wed, Jul 24, 2019 07:52होमपेज › Sangli › आठ नगरसेवक नारायण राणेंना भेटले

आठ नगरसेवक नारायण राणेंना भेटले

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:08PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शनिवारी सांगली दौर्‍यात महापालिकेच्या आठ नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भेटले. अर्थात यातील काहीजणांची भेट स्वागतापुरती, तर काहींची भेट गोपनीय असल्याचे समजते. याला खुद्द श्री. राणे यांनीच पत्रकार बैठकीत कबुली दिली. त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मोर्चेबांधणीबरोबरच लवकरच आगामी सांगलीच्या महापालिका निवडणुकीबद्दल भूमिका ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पक्षबांधणी अन् चाचपणीसाठी त्यांनी शुक्रवारपासून कोल्हापुरातून राज्य दौर्‍याला सुरुवात केली. त्यानंतर आज सांगलीत त्यांनी बैठका घेतल्या. त्यादृष्टीने नाराज महापालिकेतील काही नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना त्यांनी भेटीचे निमंत्रण दिले होते. युवानेते सम्राट महाडिक, नजीर वलांडकर, लालू मेस्त्री आदींनी यासाठी ‘फिल्डिंग’ लावली होती.

राणे यांच्यासोबत पुत्र आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा होता. श्री. राणे यांना खुलेपणाने भेटण्याऐवजी नगरसेवकांसह काहीजणांनी सकाळी सकाळीच ते थांबलेल्या हॉटेलमध्ये तेथे जावून ‘शुभेच्छा’ दिल्या. यामध्ये नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, नगरसेविका पती हेमंत खंडागळे आदींचा समावेश होता. मिरजेच्या चार, तर कुपवाडच्या एका नगरसेविकेनेे राणे यांची भेट घेतली. अर्थात या भेटीबद्दल मात्र त्यांनी मौनच बाळगले. त्यापैकी एक वगळता हे सर्वजण काँग्रेसचे नाराज नगरसेवक आहेत. त्यामुळे ते राणे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. फक्‍त बैठकीतील चर्चेबाबत मात्र गोपनीयता बाळगण्यात आली. 

भाजपच्यावतीने माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, नगरसेवक युवराज बावडेकर, तर आसिफ बावा, लालू मेस्त्री, उमर गवंडी आयुब पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी समाजातर्फे राणे यांना भेटून शुभेच्छा दिल्या. शहरातील अनेक व्यापारी, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सकाळी 10 ते 11 या वेळेत शासकीय विश्रामगृहात राणे यांनी चर्चा केली.