Mon, Mar 25, 2019 13:58होमपेज › Sangli › जिल्ह्यात ईद-उल्-दुहा उत्साहात

जिल्ह्यात ईद-उल्-दुहा उत्साहात

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 8:13PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ईद  उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. विश्‍वशांती, अखंडता अन् भाईचारा वाढीसाठी प्रार्थना करण्यात आली. केरळ येथे अतिवृष्टीने बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाय आपत्तीग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यात आले. यातून 4 लाख रुपये निधी गोळा झाला. संजयनगर आक्सा मस्जिद येथे 30 हजार रुपये संकलित झाले. सुमारे 5 लाख निधी संकलित करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय पदाधिकारी, अधिकार्‍यांनी गर्दी केली होती. ईदनिमित्ताने शहरात आनंदाचे वातावरण होते.

मंगळवारी रात्री चंद्रदर्शन झाले. त्यानुसार सांगली, मिरजेसह जिल्ह्यात बुधवारी ईद साजरी होणार असल्याचे ईदगाह कमिटीचे अध्यक्ष माजी महापौर हारुण शिकलगार व सचिव मुन्ना कुरणे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ईदगाह मैदानावर सकाळी 8.30 वाजता हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. 

विजयनगर मस्जिदचे हुजेर काशमी यांनी नमाजपठण घडविले. खुदबा पठण वॉन्लेसवाडी मस्जिदचे आबिद शेख यांनी केले.  मजमा जोडणे आणि संदेशपठण संगतरास मस्जिदचे मुफ्ती सादिक यांनी घडविले. यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्य तसेच केरळ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली, सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात आली. 

आणखी पाऊस होऊन दुष्काळाचे सावट पुन्हा न येवो, अशीही  दुवा करण्यात आली.   जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील, नगरसेवक संतोष पाटील, कैलास मुळके, माजी नगरसेवक राजेश नाईक व मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

मिरजेत सामुदायिक नमाजपठण 

येथील शाही ईदगाह मैदानावर बकरी ईदनिमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या.

बकरी ईदनिमित्त बुधवारी शहरातील अनेक मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले.शाही ईदगाह मैदानावर बकरी ईदनिमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती, सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, व्यापारी संघटनेचे नेते गजेंद्र कुल्लोळी, सामाजिक कार्यकर्ते महेश भोसले, संतोष कोळी, नंदू कदम, सतीश खोत, अमोल सातपुते, मदन तांबडे, विजय पाडगावकर, मनोहर कुरणे, डॉ. विक्रम कोळेकर आदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.