Thu, Apr 25, 2019 23:31होमपेज › Sangli › शिक्षणाधिकारी हजर; पदाधिकार्‍यांकडून बेदखल

शिक्षणाधिकारी हजर; पदाधिकार्‍यांकडून बेदखल

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:07AMसांगली : प्रतिनिधी

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे सोमवारी रजेवरून हजर झाल्या. त्यांच्या रूजू होण्यावर पदाधिकार्‍यांनी नापसंती व्यक्‍त केली आहे. मंगळवारी शिक्षण समिती सभेला सचिव म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी आर. जी. पाटील यांनाच कामकाज पाहण्याबाबत सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी सांगितले. दरम्यान वाघमोडे यांच्या हजर होण्यावरून पदाधिकारी - सीईओ यांची शुक्रवारी बैठक होणार आहे.  

प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी चर्चा झाली होती. शिक्षण विभागाचा कारभार सुधारत नसेल तर शिक्षणाधिकारी वाघमोडे यांना शासनाकडे परत पाठवा,अशी मागणीही काही सदस्यांनी केली होती. दरम्यान या सभेनंतर वाघमोडे रजेवर गेल्या. त्यांना रजेवर पाठविण्यात आले असे सांगितले जाते. वैद्यकीय रजेवर असल्याचे वाघमोडे यांच्याकडून सांगितले जात होते. 

दरम्यान वाघमोडे यांच्या जागी प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कवठेमहांकाळचे गटशिक्षणाधिकारी आर. जी. पाटील यांची नियुक्‍ती केली होती. त्यावरून पदाधिकारी व प्रशासनाने पवित्रा स्पष्ट केला होता. मात्र वाघमोडे सोमवारी हजर झाल्या. अल्पावधीतच हजर झाल्याने पदाधिकार्‍यांनी खासगीमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त केली. स्थायी समिती सभेतही हा विषय उपस्थित झाला. 

मंगळवारी शिक्षण समिती सभा होती. या समिती सभेचे सचिव म्हणून कोण काम पाहणार याकडे लक्ष लागले होते. सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी सभेचे सचिव म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी पाटील यांनी काम पाहण्यास सांगितले. 

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत हे कर्नाटकच्या अभ्यास दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी ते जिल्हा परिषदेत येणार आहेत. पदाधिकारी - मुख्य कार्यकारी अधिकारी बैठक होणार आहे. या बैठकीत शिक्षणाधिकारीपदाचा तिढा कसा सोडविला जाणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान सदस्यांचा एक गट शिक्षणाधिकारी वाघमोडे यांना हजर करून घेण्यासाठी कार्यरत असल्याची चर्चा जोरात आहे. 

मंगळवारी शिक्षण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी तम्मनगौडा रवि-पाटील होते. सदस्य शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, सुरेखा जाधव, शांता कनुंजे, सुलभा अदाटे, संध्या पाटील, शारदा पाटील, स्नेहलता जाधव उपस्थित होते.