Fri, May 24, 2019 06:41होमपेज › Sangli › विकेंद्रित यंत्रमागांसाठी ई वे बिल अट नको

विकेंद्रित यंत्रमागांसाठी ई वे बिल अट नको

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 10:09PMविटा : प्रतिनिधी

जीएसटीच्या ई वे बिल प्रणालीच्या  तरतुदीमधून विकेंद्रित यंत्रमाग लघुउद्योगास काही सवलती देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अनिलराव  बाबर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यावेळी अनिल यंत्रमाग संघाचे अध्यक्ष वैभवतात्या म्हेत्रे यांच्यासह विट्यातील यंत्रमाग धारक उपस्थित होते.ना. मुनगुंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.  
आमदार बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की  दि. 25 मे पासून जीएसटी कायद्या अंतर्गत 50 हजारांपेक्षा जास्त किंमतीचा माल   रवाना करताना संगणक प्रणालीच्या माध्यमातून ई वे बिल देयकासोबत जोडणे बंधनकारक केले आहे.ते अन्यायकारक आहे.

विकेंद्रित यंत्रमाग व्यवसायामध्ये उद्योजकाने सूत खरेदी केल्यानंतर त्या सुतापासुन कापड उत्पादन करुन विक्री करेपर्यंत अनेकदा त्याची वाहतूक करावी लागते. वार्पिंग, सायझिंग, रिवायर्डिग,जॉबवर्क, रंगकाम या वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी  सूत व कापड अनेक वेळा वेगवेगळ्या वाहनांनी ,वेगवेगळ्या ठिकाणी पाठवावे लागते.नंतर तयार कापडाची विक्री करुन ते खरेदीदारास पाठवावे लागते.यातील बरीचशी वाहतूक गावातल्या गावात आणि शंभर  किलोमीटरच्या आत केली जाते. नव्या नियमानुसार या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वेळी नवीन ई वे बिल तयार करावे लागते. या बिलामध्ये वाहन क्रमांकासह इतर तपशील भरावा लागतो. तसेच या  बिलाच्या मालाची वाहतूक 24 तासात पूर्ण करणे अनिवार्य असते.दैनंदिन व्यवहारामध्ये या सर्व अटी पाळणे शक्य नसते. त्यामुळे अशा प्रकारे ई वे बिल बनवताना यंत्रमाग व्यावसायिकांना फार त्रास होत आहे.  त्यामुळ सूत खरेदीपासुन ते कापड विक्रीपर्यंतच्या मधल्या सर्व टप्प्यावर ई वे बिल बनविण्याची सक्ती रद्द करावी.गुजरात व तमिळनाडूत राज्य शासनाने  विकेंद्रीत यंत्रमाग लघुउद्योगांसाठी अशा सवलती नुकत्याच लागू केल्या आहेत.