Sun, Aug 18, 2019 20:37होमपेज › Sangli › मनपातील विजयामुळे भाजप जिल्ह्यात फ्रंटफूटवर

मनपातील विजयामुळे भाजप जिल्ह्यात फ्रंटफूटवर

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:08PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक जिंकल्याने  जिल्ह्यात भाजप पुन्हा फ्रंटफूट आला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष  बॅकफूटवर गेले आहेत. या निकालाने भाजपमधून स्वगृही परतणारे जिल्ह्यातील  अनेक नेते थांबले आहेत. तसेच आगामी  विधानसभा,  लोकसभा  निवडणुकीवर काही प्रमाणात या निकालाचा परिणाम होणार आहे. काही मतदारसंघात मनपाप्रमाणे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.  

देशभर  व राज्यभर  भाजपविरोधात वातावरण आहे. याचा  फायदा आपल्याला होणार, या भ्रमात आघाडीचे नेते राहिले. सभा, भाषणबाजी करून वातावरण निर्माण करण्यात त्यांनी बाजी  मारली. भाजपने निवडणूक सोडूनच दिली आहे, असेच आघाडीच्या नेत्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना फाजील आत्मविश्‍वास आला होता. यातूनच अंतर्गत   व्यूहरचना    करण्यात   कमालीचा गाफीलपणा आघाडीच्या नेत्यांनी दाखविला. 

मात्र  भाजपने अत्यंत ‘चाणाक्ष’पणे  खेळी केल्या. अभ्यास करुन वर्षभरापासून रणनिती ठरविली. अ‍ॅन्टी भाजप वातावरण असतानाही  प्रदेश  पातळीवरील प्रत्येक नेते, पदाधिकार्‍यांना  जबाबदारी वाटून दिली. आघाडीचे नेते उमेदवारीच्या घोळात अडकले असताना भाजपने प्राथमिक टप्प्यात मात्र मतदारांपर्यंत अंतर्गतरित्या पोहचण्याचे  काम सुरू ठेवले होते. दुसरीकडे प्रभाग मोठे झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार व नेतेही गोंधळात पडले होते. आघाडीच्या अनेक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही. परंतु प्रभाग मोठे झाल्याचा सर्वाधिक फायदा मात्र भाजपने उठविला. भाजपची निष्ठावंत मते एकगठ्ठा  प्रभागातील चारही उमेदवारांना मिळाली. ही मते ‘कॅश’ करीत भाजपने निम्मी लढाई जिंकली. प्रभाग लहान असते तर भाजपच्या मतांत पूर्वीप्रमाणेच फूट राहिली असती. 

अंतिम टप्प्यात आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाषणबाजीत मश्गूल असताना भाजपच्या मंत्री, नेत्यांनी काहीही गाजावाजा न करता शांत डोक्याने  बूथ यंत्रणेव्दारे ‘घरा-घरात पोहोचण्याचे’  काम  सुरुच  ठेवले  होते. वातावरण बघून मुख्यमंत्री, मंत्री यांच्या सभा प्रसंगी रद्द करण्याचा निर्णय घेतला.  पण ठरलेल्या नियोजनानुसार  ‘थिंक टँक’ने काम सुरुच ठेवले होते. त्यासाठी काहींना ‘हद्दी’तून ‘पार’ घालवून  तसेच  हाताशी असलेल्या ‘यंत्रणे’चा पुरेपूर वापरही ‘चाणाक्ष’पणे करुन  घेतला. ‘रात्रं-दिवस’ नियोजनबध्दपणे केलेल्या प्रचाराचा या  निवडणुकीत भाजपला  निश्‍चितपणे चांगलाच उपयोग झाला.  

एकूणच आघाडीच्या नेत्यांना काही कळायच्या आत भाजपने निवडणूक जिंकून बाजी मारली. सर्वत्र विरोधी वातावरण असताना या निकालाने बॅकफूटवर गेलेला भाजप पुन्हाफ्रंटफूटवर आला आहे. भाजपचे कोमात गेलेले पदाधिकारी, कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. या निकालाचा  जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा  परिणाम  होणार आहे. विधानसभा    व  लोकसभेला याचा निश्‍चितच फायदा भाजपला होणार आहे.

सांगली,  मिरज,  शिराळा, जत  हे  मतदारसंघ  भाजपसाठी आणखी  सेफ  झाले  आहेत. वाळवा, पलूस-कडेगाव या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी   परिस्थिती आहे. खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ याठिकाणीही मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. तसेच भाजपची ही लाट रोखण्यासाठी लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्‍न आघाडीपुढे पडणार आहे. याबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या व तेथे घुसमट होत असलेल्या अनेकांनी स्वगृही परत येण्याची  तयारी चालविली होती. पण या  निकालाने  त्यांनी   पुन्हा  ‘ यु टर्न’ घेतला आहे. भाजपमध्येच थांबून सत्तेची  फळे   चाखता  येतील का, याची चाचपणी ‘गयारामांनी’ सुरू केली आहे. यामुळे भाजपचा जिल्ह्यातील खुंटा  पुन्हा मजबूत झाला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे. 

आघाडीच्या नेत्यांची व्यूहरचना चुकली

या निवडणुकीत आघाडींच्या नेत्यांची व्यूहरचना पूर्णपणे चुकली. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करुन आघाडीने आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली. तसेच पक्षासाठी बंडखोरांना काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते थांबवू शकले नाहीत. मैत्रीपूर्ण लढती व  बंडखोरी रोखल असती तर आघाडी आरामात सत्तेत  आली असती.  गावभागात  स्वाभिमानीला बरोबर घेतले असते तर  या  जागाही आघाडीला  मिळाल्या असत्या. पण  पवार गटाचा ‘सर्वोदय’ होईल ही भिती आडवी आली.  काहींनी  ‘विशाल’ राजकीय विचार करण्याऐवजी आपल्या प्रभागापुरते पाहिले. विधानपरिषदेवेळी गद्दारी केलेल्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी काँग्रेसने  नेत्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न करुन काही  ठिकाणी च्या उमेदवारांना  तिकिट नाकारले. त्यामुळे अनेक  ठिकाणी ‘जीत’ होण्याऐवजी ‘हार’ पत्करावी लागली. तसेच  निवडणूक जिंकून देण्यात माहीर असलेल्या मिरजेतील खेळाडूंना  सोबत घेऊन आघाडीच्या नेत्यांनी  बेरजेचे राजकारण करायला हवे होते. पण याचा  विचारातही आघाडीच्या नेत्यांनी केला नाही.  यामुळे  आघाडीचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम होण्याची वेळ आली.

दोनही जिल्हाध्यक्ष होते चार हात लांब 

या निवडणुकीपासून काँग्रेस,राष्ट्रवादी व भाजपचे जिल्हध्यक्ष  लांब होते.  काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम हे पक्षाचे गेली अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. तसेच  विलासराव शिंदे यांच्याकडेही राष्ट्रवादीची धुरा मागील अनेक वर्षांपासून आहेत. या दोघांचा तीनही शहरात चांगली उठबस आहे. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत तर त्यांचा जनसंपर्क ‘चांगलाच’ वाढला होता. त्यांनी या निवडणुकीत गांभिर्याने लक्ष घातले असते तर चार-पाच जागांचा फरक पडला असता. पण त्यांंच्या मनात कोणते ‘हिशेब चुकते’ करायचे होते, हे त्यांनाच माहित. 

राजकारण करायचे आहे, भजनी मंडळ चालवायचे नाही 

कोणत्याही परिस्थितीत ही  निवडणूक जिंकायची, असा चंग  संघ परिवार व भाजपच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी बांधला होता. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील  उमेदवार घेण्याची तयारी केली होती. पण हा डाव फसल्यानंतर प्लॅन बी नुसार मिळेल त्यांना घेवून ठरल्याप्रमाणे भाजपने ही निवडणूक ताकदीने लढविली. सांगलीतील  काही  नेत्यांनी स्वच्छ उमेदवारांचा आग्रह धरला. पण त्यांना पक्षश्रेष्ठींनी ‘आपल्याला पक्ष  चालवायचा आहे,  राजकारण करायचे आहे, भजनी मंडळ चालवायचे नाही’ असा ‘सूचक’ व ‘मौलिक’ सल्ला   दिला. तसेच तर जिल्ह्यातील काही ‘खास’ व ‘सम्राट ’ नेत्यांनी  प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादी स्टाईल आणण्याची लुडबूड  केली. पण भाजप नेत्यांनी कोणाचे काही चालू दिले नाही. यामुळे  या दिग्गज नेत्यांनी आम्ही निवडणुकीत भाग घेणार नाही, अशी धमकी देण्याचा प्रयत्न  केला. त्यावर भाजपश्रेष्ठींनी ‘तुम्ही आला तर ठीक, नाहीतर तुमच्याशिवाय निवडणूक जिंकू’ असा ‘गर्भित’ इशारा दिला. यामुळे हे बडे नेते गप्पगार बसले.  

स्वाभिमानी आघाडीचा झाला ‘अभिमन्यू’

एकेकाळी माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाचा सांगलीत दबदबा होता. अलिकडे तो काही प्रमाणात कमी झाला आहे.  राजकीय व्युहरचना करणे स्वाभिमानीच्या नेत्यांना अजिबात जमले नाही. वास्तविक पाहता स्वाभिमानीच्या  युवा नेत्यांनी भाजपबरोबर संधान साधण्याची खेळी करायला हवी होती. यातून त्यांचा ‘सर्वोदय’ होण्याबरोबर हितशत्रूंचा ‘करेक्ट ’ कार्यक्रम झाला असता. तसेच गावभागावरही वर्चस्व अबाधित राहिले असते. पण चुकीच्या खेळीमुळे स्वाभिमानीची सध्याची  अवस्था चक्रव्युहात फसलेल्या अभिमन्युप्रमाणे झाली आहे.