Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › पॉस मशीनच्या गोंधळामुळे  लोकांची कोंडी

पॉस मशीनच्या गोंधळामुळे  लोकांची कोंडी

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:22PMइस्लामपूर : सुनील माने

वाळवा तालुक्यातील बहुसंख्य स्वस्त धान्य दुकानांत पॉस मशीनमुळे गोंधळ सुरू असून त्यामुळे    गोरगरीब रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. कार्डधारकांतून यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.इस्लामपूर शहर व तालुक्यात सुमारे 200 हून अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांतून दर महिन्याला गहू, तांदूळ, डाळ रास्त  दरात शिधा पत्रिका धारकांना उपलब्ध करून दिली  जाते. प्रत्येक दुकानदाराकडे केसरी, पिवळे रेशनकार्डधारक आहेत. मात्र यामध्येही अ आणि ब वर्ग करण्यात आल्याचा फटका बहुसंख्य कार्डधारकांना बसत असल्याची तक्रा आहे. आता तर शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशीन दिले आहे. ती मशीन वापरण्याचे सक्त आदेश आहेत. 

मात्र  अनेक दुकानदारांना हे मशीन कसे चालवावे, याबाबतचे प्रशिक्षणही दिले होते. मात्र अनेकांनी प्रशिक्षण घेतले नाही. यामुळे  हे मशीन कसे चालवायचे, हे अनेक दुकानदारांना कळत नाही. त्यामुळे धान्य घोटाळा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.  खरे तर प्रत्येक रेशनकार्डधारकांनी आधारकार्ड, अन्य कागदपत्रांची पूर्तता दुकानदारांकडे केली आहे. परंतु दुकानदार पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगून रेशनकार्डधारकांना पुरवठा विभागाकडे जाण्याचा सल्ला देत आहेत असे शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांनी सांगितले. 

रेशनकार्डधारक पुरवठा विभागाकडे  गेल्यावर तेथेही अधिकारी व कर्मचार्‍यांकडून कार्डधारकांना ‘यात आमचा काही दोष नाही. दुकानदारांनाच त्यांचे मशीन घेऊन आमच्या कार्यालयात अपडेट करण्यास सांगा’, असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांची  द्विधा स्थिती  झाली आहे. पॉस मशीन अपडेट नाही, चालत नाही, अशी कारणे सांगून धान्याचा घोटाळा होत असावा  अशा  तक्रारी शहर शिवसेनेकडे आल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन पॉस मशीन चालविता येते का, याची चौकशी करावी. तसेच ज्यांची कागदपत्रे अपडेट नाहीत ती अपडेट करून घ्यावीत अशी मागणी आहे.