Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Sangli › पलूस-कडेगाव पोटनिवडणूक जाहीर

पलूस-कडेगाव पोटनिवडणूक जाहीर

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:55AMसांगली : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीचा कार्यक्रम गरुवारी  जाहीर झाला.  निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्यात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी दि. 28 मे रोजी मतदान, तर दि. 31 मे रोजी  

मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने देशातील चार लोकसभा आणि दहा राज्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यात पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा जागांचा समावेश आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 मध्ये भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्‍त झाली होती. तर पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे निधन झाल्याने ही जागाही रिक्‍त होती. पलूस-कडेगाव विधासभा निवडणुकीची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.  

ते म्हणाले, पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघात दि. 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदारयादी नुसार पुरूष मतदार 1 लाख 35 हजार 663, स्त्री मतदार 1 लाख 29 हजार 635, अन्य मतदार 3, असे एकूण 2 लाख 65 हजार 301 मतदार आहेत. 

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.  2 लाख 63 हजार 704 मतदान ओळखपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात 282 मतदान केंद्रे  आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचारी नेमणूक आणि आवश्यक वाहनांचे अधिग्रहण पुरेशा प्रमाणात करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडेगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख आहेत.  
कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेटे आणि पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.  निवडणूक प्रक्रिया  दि. 2 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

दरम्यान या निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोर पालन करून शांततामय, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात ही पोटनिवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी  चव्हाण यांनी केले आहे.

जनतेची इच्छा, पक्षाचा आदेश मानणार : डॉ. विश्‍वजित कदम

सांगली : प्रतिनिधी 

पलूस-कडेगाव विधानसभा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी प्रचंड काम उभे केले आहे. त्या मतदारसंघातील जनतेचे त्यांच्यावर  प्रेम आणि विश्‍वास होता. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे सुरू राहावा, अशी त्या मतदारसंघातील जनतेची इच्छा आणि अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेच्या भावना आणि आदेश यांचा आदर करावाच लागेल, असे मनोगत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी व्यक्‍त केले.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे, त्यासंदर्भात विचारले असता ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मतदारसंघातील जनतेची इच्छा महत्त्वाची आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा आदेश आणि निणर्यही महत्त्वाचा आहे. त्यामुळे पक्ष उमेदवारीबाबत निर्णय घेईल. 

निवडणूक बिनविरोध नाही : पृथ्वीराज देशमुख निर्णयासाठी भाजपची 3 मे रोजी बैठक

सांगली : प्रतिनिधी

माजी आमदार (कै.) संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यावेळची पोटनिवडणूक बिनविरोध केली होती का, असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केला.  त्यामुळे आताही पलूस-कडेगाव मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध कशासाठी करायची? कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही, असे  त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस-भाजप लढत होणार, असे संकेत  देशमुख यांनी दिले. माजी मंत्री व पलूस-कडेगावचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या या जागेसाठी  पोटनिवडणूक होत आहे. 

भाजपच्या भूमिकेबाबत विचारता देशमुख म्हणाले, (कै.) संपतराव देशमुख हे भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते. त्यांचे अकाली निधन झाले होते. त्यांचे राजकीय वारसदार म्हणून जनतेच्या मागणीनुसार मी निवडणूक लढविली. त्यावेळी  काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. ते म्हणाले, डॉ. कदम यांचे कार्य मोठे आहे. पण आता त्यांच्या पश्‍चात  निवडणूक बिनविरोध कशासाठी? काय असेल ते मैदानात स्पष्ट होऊ द्या. 

भाजपच्या उमेदवारीबाबत विचारता देशमुख म्हणाले, दि. 3 मे रोजी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. अर्थात नव्या लोकप्रतिनिधीला  जेमतेम वर्षभराचा  कालावधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारीसह एकूणच निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत भूमिका ठरविली जाईल.