Mon, Mar 25, 2019 13:37होमपेज › Sangli › मळणगाव बंधार्‍यात बुडून दोघांचा मृत्यू

मळणगाव बंधार्‍यात बुडून दोघांचा मृत्यू

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 11:36PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील मळणगाव येथील अग्रणी नदीतील बंधार्‍यात सख्ख्या चुलत भावाला पोहण्यास शिकवताना दोघांचा बुडून अंत झाला. ही घटना दुपारी घडली. दिनेश रमाकांत पोतदार (वय 32), त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनंतकुमार पोतदार (13, दोघेही रा. अंजनी) अशी मृतांची नावे आहेत.स्थानिकांनी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावळज (ता. तासगाव) येथील रत्नाकर पोतदार यांनी मळणगाव येथील अग्रणी नदीच्या काठावर असलेली शिंदे यांची जमीन कसण्यासाठी घेतली आहे. आज दुपारी पोतदार यांच्या कुटुंबातील दिनेश पोतदार आणि त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनंतकुमार यांनी उकाडा असल्यामुळे अग्रणी नदीतील बंधार्‍यात पोहण्याचा निर्णय घेतला. 

अनंतकुमार यास पोहता येत नव्हते. दिनेश यांनी त्याला पोहण्यास शिकवण्याचे ठरविले. दोघेही बंधार्‍याच्या खोल पाण्यात गेले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर अनंतकुमार घाबरून बुडू लागला. त्यावेळी दिनेश यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अनंतकुमारने घाबरून त्यांना मिठी मारली. त्यामध्ये दोघेही बुडाले.चुलते रत्नाकर यांनी दोघेही अजून का परत आले नाहीत, म्हणून नदीपात्राच्या कडेला पाहिले. त्यावेळी दोघांचे कपडे बाजूला आढळून आले. त्यानंतर त्यांनी आरडा- ओरडा केला. नदीच्या काठावर असलेल्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अण्णासाहेब मलमे, नंदकुमार सरवदे, भाऊसाहेब मलमे, विकास मलमे, नचिकेत पाटील यांनी पाण्यातून अनंतकुमार याचा मृतदेह बाहेर काढला. दिनेश यांचा मात्र शोध लागत नव्हता. दीड तासाच्या प्रयत्नानंतर दिनेश यांचाही मृतदेह सापडला.
अग्रणी नदी पत्रातील यल्लमा मंदिरानजीक मळणगाव येथील नागरिकांनी गर्दी केली.  कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.