Wed, Mar 27, 2019 06:28होमपेज › Sangli › भाव नसल्याने शेतीचे गणित कोलमडले 

भाव नसल्याने शेतीचे गणित कोलमडले 

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 7:23PMइस्लामपूर : मारूती पाटील

शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडत चालला असतानाच उसालाही योग्य दर मिळणार नसल्याने आता त्यात भरच पडणार आहे. घसरत्या शेतीमालाच्या भावामुळे केवळ शेतीवरच अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक गणित जुळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

यावर्षी सोयाबीन पिकाला हमीभावही मिळाला नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. कडधान्य पिकांचीही तीच अवस्था झाली. त्यामुळे पाऊसमान व पिकांचे चांगले उत्पादन होऊनही शेती फायद्यात येण्याऐवजी घाट्यातच गेली. अतिरिक्त कडधान्यांच्या उत्पादनामुळे व्यापार्‍यांनी कडधान्यही खरेदी करण्याचे बंद केल्याने शेतकर्‍यांना हा माल कोठे विकायचा, असा प्रश्‍न पडला. 

गळीत हंगामाच्या सुरुवातीला साखरेला चांगला भाव होता. मात्र गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे भाव गडगडल्याने कारखान्यांनी जाहीर केलेला ऊस दरही देणे बंद केले आहे. त्यामुळे यावर्षी उसाला साडेतीन हजार रुपयापर्यंत दर मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. आता उसाला 3 हजाराऐवजी 2 हजार 500 रुपयेच पहिला हप्‍ता मिळणार असल्याने या मिळणार्‍या रकमेतून पीककर्ज, शेतीची मशागत, खते, बी-बियाणे खर्च करून उर्वरित रकमेत संसार कसा चालवायचा, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. 

पारंपरिक शेतीला फाटा देत काही तरूण आता भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. मात्र भाजीपाल्यालाही शाश्‍वत भाव मिळत नसल्याने अनेकजण या शेतीतही कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने अर्थसंकल्पात शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली असली तरी ती प्रत्यक्षात उतरेल की नाही, याबद्दलही शेतकर्‍यांच्या मनात शंका आहे. यावर्षी निसर्गाने शेतकर्‍यांना चांगली साथ दिली असली तरी शेतीमालाला योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.