Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Sangli › हुमणीमुळे वाळवा तालुक्यातील शेतकरी धास्तावले

हुमणीमुळे वाळवा तालुक्यातील शेतकरी धास्तावले

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 8:07PMइस्लामपूर : संदीप माने

शेतामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने तालुक्यातील शेतकरी धास्तावला आहे. ऊस, भुईमूग, भात, हळद आदी पिके या किडीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. उसाच्या खोडवा, नेडवा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात हुमणी किडीने थैमान घातले आहे. जून ते डिसेंबरअखेर हुमणी अळीची पूर्ण वाढ होते. या काळात किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हुमण्यांकडून  भुईमूग, हायब्रीड, मका, भात आदी पिकांच्या मुळ्या फस्त केल्या जात आहेत. यामुळे ही पिके पिवळी पडू लागली आहेत.

उसाच्या खोडवा, नेडवा पिकाला हुमण्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हुमण्यांनी उसाचे खोड, मुळे कुरडतल्याने उसाची वाढ थांबते. ऊस पिवळा पडून कोलमडत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. 

शेतकरी हुमणी किडीच्या बंदोबस्तासाठी रासायनिक औषधे, जैविक बुरशी आदींचा  वापर करू लागले आहेत. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. बागायत जमिनीत जास्त ओलावा, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक असल्याने किडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक फटका उसाला बसत आहे. बोरगाव, नेर्ले, कासेगाव, ऐतवडे खुर्द, कुरळप, येडेनिपाणी आदी परिसरात हुमण्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. कृषी विभागाची कीड नियंत्रण मोहीम कागदावरच असून 50 टक्के उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

कृषी विभाग सुस्तच...

चार-पाच वर्षांपूर्वी शिराळा तालुक्यात हुमणी किडीने शेकडो एकरातील पिके वाळून गेली होती. आता वाळवा तालुक्यातही हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. मात्र, कृषी विभागाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना, मार्गदर्शन मिळत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.