Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Sangli › ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात सकाळपासून  ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी गुरुवारी सकाळी पावसाच्या सरी पडल्या. असे वातावरण आणखी दोन  दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने द्राक्ष व बेदाणा शेतकरी धास्तावला आहे. भाजीपाला, ज्वारी, गहू आदी पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

बेदाण्याचे नुकसान होणार?

मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तर कर्नाटकमधील अथणी, विजापूर तालुक्यात सध्या काही द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी रॅकवर आहेत. काहींची बागेतून घडांची काढणी सुरू आहे. अनेक बेदाणा शेडवर पहिल्या ते बाराव्या दिवसांपर्यंतची द्राक्षे बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे  या  बेदाण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे बेदाण्यावर काळे  डाग पडून वजनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किलो मागे 30 ते 40 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. 

हरभरा, गहू, ज्वारीला फटका बसणार

कडेगाव, शिराळा तालुक्यात द्राक्ष पिकांचे प्रमाण कमी असले तरी या ठिकाणी गहू, ज्वारी, भाजीपाला आहे.  गहू, ज्वारीची  मळणी सुरू आहे. ढगाळ हवामानाचा परिणाम या पिकांवर होणार आहे.  मळणी सुरू असलेल्या  हरभरा, गहू, ज्वारी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे  मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. 

जत तालुक्यात डाळिंब बागा अडचणीत

जत तालुक्यात द्राक्ष व डाळिंबा बागा मोठ्या प्रमाणात आहेत. ढगाळ वातावरणामुळे डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.