Thu, May 23, 2019 04:30होमपेज › Sangli › ड्रेनेज बॅकवॉटरचा अर्ध्या सांगलीला फटका

ड्रेनेज बॅकवॉटरचा अर्ध्या सांगलीला फटका

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 11 2018 8:45PMसांगली : प्रतिनिधी

येथील कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगरमध्ये पाईपलाईन खराब होऊन चेंबर्स निकामी झाली आहेत. त्यामुळे त्या सांडपाण्याच्या बॅकवॉटरचा फटका अर्ध्या सांगलीला बसू लागला आहे. हे सांडपाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरांमध्ये शिरू लागले आहे. परंतु महापालिका त्याची दुरुस्ती करीत नाही. त्या ऐवजी  मोटारी लावून सांडपाणी उपसण्याची तात्पुरती मलमपट्टी करीत लाखो रुपये वाया जात आहेत.  प्रशासनाने पाईपलाईन बदलून चेंबर्स दुरुस्तीद्वारे कायमचा तोडगा काढला पाहिजे. त्याऐवजी मंजुरीचा कागदी खेळ सुरू ठेवला आहे.

मूळ सांगली गावठाणातील सांडपाणी थेट कृष्णा नदीत न मिसळता भारतभीम जोतीरामदादा पाटील आखाड्यातील मलनि:स्सारण केंद्राकडे पाठविले जात असे. तेथे त्यावर प्रक्रिया करून ते पाणी हरिपूर येथील लोखंडी पुलाखालून  नदीत सोडले जात होते. यामध्ये गावभाग, खणभाग, वखारभाग, दत्त-मारुती रस्ता, गणपती पेठ, हरभट रोडसह सिव्हिल चौक मार्गे अनेक भागातून येणार्‍या सांडपाण्याचा समावेश होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून ड्रेनेज योजनेअंतर्गत कालबाह्य झालेल्या  मलनि:स्सारण केंद्राचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया बंद करण्यात आली. 

त्यामुळे सांडपाण्याच्या दाबाने कोल्हापूर रस्त्यावर भगदाड पडू लागले. त्यामुळे ती संपूर्ण पाईपलाईन बदलण्याऐवजी हे सांडपाणी कबाडे हॉस्पिटल चौकातून ओव्हरफ्लो पाईपलाईनला जोडण्यात आले. ते थेट भारतनगरमार्गे नदीत सोडण्यात येत होते. 

आता ती पाईपलाईनही खराब होऊन भारतनगर परिसरात भगदाड पडले आहे. त्याच्या बॅकवॉटरचा फटका मागे बसू लागला आहे. गेल्या महिन्यापासून दत्त-मारुती रस्त्यावर सांडपाणी पसरत आहे. शिवाय भारतनगर परिसरातही सांडपाणी शिरले होते. आता या सर्व पाईपलाईन बदलण्याशिवाय पर्याय नाही. परंतु हे काम अवघड असल्याने प्रशासनाने तात्पुरती डागडुजी म्हणून भारतनगर येथे खड्ड्यांच्या अलिकडे विद्युत मोटारी लावून सांडपाणी उपसण्याचा प्रयत्न केला आहे. 

परंतु त्यानंतरही हे सांडपाणी हटलेले नाही. आता खणभाग - बसस्थानकमार्गे जाणार्‍या पाईपलाईनमधून  बॅकवाटर पसरू लागले आहे. येथील शाहू उद्यान परिसरातील काही घरांमध्ये हे सांडपाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी पाठपुरावा केला. पण पाईपलाईन बदलण्याचे काम खर्चिकआहे. टेंडर प्रक्रिया सुरू आहे, असे अधिकारी सांगतात.

वास्तविक विविध कामे अत्यावश्यक सेवेनुसार विनानिविदा केली जातात. आयुक्तांना तसे अधिकारही आहेत. मात्र  याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे निविदा प्रकियेचा खेळ सुरू असताना हे सांडपाणी हळूहळू अर्ध्या शहरात पसरण्याचा धोका आहे.