Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Sangli › युवक काँग्रेस निवडणुकीत अंतर्गत संघर्षाला बगल 

युवक काँग्रेस निवडणुकीत अंतर्गत संघर्षाला बगल 

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 13 2018 12:07AMकडेगाव : रजाअली पिरजादे

राज्यात युवक काँग्रेस निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी   लोकशाही मार्गाने पक्षांतर्गत निवडणुकीच्या मार्गाने होत आहेत. या निवडणुकीमध्ये युवक काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष  नको, यासाठी युवक काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांनी पुढाकार घेतला आहे, समन्वय साधला आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे युवक काँग्रेस अंतर्गत  संघर्षाला बगल मिळाल्याचे चित्र दिसते  आहे. 

माजी मंत्री  (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवत  विश्‍वजित कदम यांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष टाळण्याचे प्रयत्न केले आहेत. पक्ष कसा अधिक बळकट करता येईल यासाठी ते विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानुसार  त्यांनी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते  व  इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुकीसाठी समन्वय साधला.

युवक काँग्रेसचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष व प्रदेशाध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित तांबे  यांनीही डॉ. विश्‍वजित कदम यांना भेटून या निवडणुकीत बळ देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विश्‍वजित यांनी तांबे यांना मदतीची भूमिका घेतली. त्यामुळे  तांबे आणि  प्रदेश उपाध्यक्षपदाचे उमेदवार आमदार अमित झनक यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

डॉ. विश्‍वजित कदम यांनी पक्षांतर्गत लोकशाहीच्या मार्गाने होणार्‍या युवक काँग्रेसच्या  निवडणुकीत सलग दोन  वेळा विजय मिळवला.  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद  मिळविले होते. त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनहितासाठी पदयात्रा तसेच  अनेकवेळा आंदोलने केले. त्यामध्ये त्यांना अनेकदा अटकही झाली होती. निवडणूक प्रचार, पक्षसंघटन तसेच आंदोलन  या माध्यमातून गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत  त्यांनी  राज्यभर संपर्क वाढवला. काँग्रेसची  सदस्य नोंदणीची मोहीम राज्यभरात राबविली. 

बूथ कमिटीच्या पदाधिकारी  निवडीनंतर आता युवक काँग्रेसच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव या  पदांसाठी अनेक उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.त्यामुळे   डॉ. कदम यांनी तडजोडीची भूमिका घेतली.  प्रदेश कार्यकारिणीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच  अन्य सदस्यांची  निवडही अशाच प्रकारे समन्वयानेच  होत आहे. याशिवाय जिल्हास्तरावर व विधानसभा स्तरावरही अशाच प्रकारे सलोखा आणि समन्वयाची भूमिका विश्‍वजित कदम यांनी पार पाडली आहे.