कडेगाव : शहर प्रतिनिधी
पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जनतेच्या भावनांचा विचार करीत व जनतेच्या आग्रहाखातर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व श्रीमती सोनिया गांधी यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते दि. 7 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे, अशी माहिती कडेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
जाधव म्हणाले, या मतदारसंघाचे भाग्यविधाते डॉ.पतंगराव कदम यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी या मतदारसंघासाठी दिलेले योगदान न भूतो न भविष्यती असे आहे. त्यांची अपूर्ण स्वप्ने डॉ.विश्वजित कदम पूर्ण करतील. युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर युवक जोडण्याचे विश्वजित कदम यांनी काम केले आहे.
ते म्हणाले, डॉ.विश्वजित कदम डोंगराई देवी, उदगिरी देवी, चौरंगीनाथ तसेच डॉ.पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर येथील मोहरम चौकात जाहीर सभा आहे.
Tags : Sangli, Dr Vishwajit Kadam, application, filed, tomorrow,