Sat, Jul 20, 2019 13:43होमपेज › Sangli › ध्येय निश्‍चित करा, उच्च शिक्षणात संधी अनेक

ध्येय निश्‍चित करा, उच्च शिक्षणात संधी अनेक

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 10:52PMसांगली : प्रतिनिधी

उच्च शिक्षणात संधी अनेक आहेत. पण संधीची योग्य निवड हे आव्हान आहे. जगात नवीन काय चालले आहे, जग कोणत्या दिशेने पुढे जात आहे हे ओळखून ध्येय निश्‍चित केल्यास निश्‍चितपणे चांगले करिअर घडते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी केले. 

सांगलीत कच्छी जैन सेवा समाज भवन येथे संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी एज्यु-दिशा 2018’   या प्रदर्शनास शुक्रवारी सुरुवात झाली. ‘उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.ते म्हणाले, देशात दरवर्षी 2 कोटी पदवीधर शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. त्यापैकी 15 लाख पदवीधर हे इंजिनिअर आहेत. महाराष्ट्रात इंजिनिअरिंगची 1.50 लाख प्रवेश क्षमता आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळण्याची काहीच चिंता नाही. कोणते कॉलेज आणि कोणती ब्रँच निवडायची हे ठरविणे मात्र महत्वाचे आहे. इंजिनिअरिंग कॉलेजस् भरपूर आहेत. 
अभ्यासक्रमही भरपूर आहेत. शासनाने आता फी माफीसाठी उत्पन्न मर्यादा आठ लाखांपर्यंत नेलेली आहे. त्यामुळे फीच्या पैशाचाही प्रश्‍नही आता राहिलेला नाही. आवडेल तीच विद्याशाखा निवडावी हे बोलण्यापुरते ठीक आहे, पण छंद, आवड आणि करिअर यातील फरक स्पष्टपणे ओळखता आला पाहिजे. 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, सायन्समध्येही प्रचंड संधी आहेत. ‘पीसीएम’च्या पलिकडेही अनेक अभ्यासक्रम आहेत. संशोधनाची संधी विज्ञान शाखेत आहे. मेडिकल, कॉमर्स, मॅनेजमेंट, आर्टस्मध्येही करिअरच्या अनेक संधी आहेत. योग्य कॉलेज आणि योग्य अभ्यासक्रम निवडणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रथम आपले ध्येय निश्‍चित असले पाहिजे. हे ध्येय निश्‍चित करण्यासाठी जगाची दिशा ओळखता आली पाहिजे. हे ओळखता आले की उच्च शिक्षणात संधीच संधी उपलब्ध आहेत.

इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मोठी संधी 
व्याख्यानात बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, इंजिनिअरिंगमध्ये ‘सिव्हिल’ ही प्रचंड पैसा असलेली ब्रँच आहे. देशात पायाभूत सुविधा चांगल्या नाहीत. आगामी कालावधीत या क्षेत्रात मोठे काम होणार आहे. त्यामुळे संधी अनेक आहेत. लाईफ लाँग चालणारी ही ब्रँच आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रीकल अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, एअरोनॉटिक्समध्येही करिअरची मोठी संधी आहे.