Tue, Apr 23, 2019 23:45होमपेज › Sangli › सामान्यांचा आधार काळाच्या पडद्याआड

सामान्यांचा आधार काळाच्या पडद्याआड

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 8:05PMसांगली :

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने  सर्वसामान्यांचा आधार काळाच्या पडद्याआड गेला आहे.  शिक्षण क्षेत्राबरोबरच  कदम यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही  वेगळा ठसा उमटविला असल्याच्या शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

  महाराष्ट्राचे  नुकसान

 काँग्रेस पक्षाचे नेते आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्हा व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्यावतीने मी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो.  डॉ.पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारती विद्यापीठाची स्थापना केली.  सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात धडाडीने निर्णय घेणारे, स्पष्ट वक्ते व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे ते धाडसी, दिलदार नेते होते. त्यांचे व आमचे गेल्या पन्नास वर्षाहून अधिककाळ मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या जाण्याने आमचे व्यक्तिगतही नुकसान झाले आहे.    .

- माजी आमदार विलासराव शिंदे 

 डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याचा वेगळा ठसा 

 डॉ. पतंगराव कदम यांनी  वयाच्या विसाव्या वर्षांपासून स्वकर्तृत्वावर  जीवनाची सुरुवात करून राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, औद्योगिक क्षेत्रात मोठे काम त्यांनी उभे केले. युवकांच्या हाताला काम आणि ज्ञान देण्याचे काम त्यांनी केले आहे.  सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया  केली. राज्यभर  काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने राज्याची मोठी  हानी झाली आहे. त्यांना विश्वास, विराज उद्योग समूह तसेच कुटुंबामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली. 

- माजी आमदार मानसिंगराव नाईक

 उत्तुंग उंचीचा नेता गमावला

डॉ. पतंगराव कदम यांनी  कष्टातून व प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. भारती   विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचे विश्‍व निर्माण करणारा नेता म्हणून संबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराने पाहत होता. मंत्री म्हणून त्यांनी आदर्शवत काम केले.  मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम करताना नैसर्गिक आपत्तीवेळी सामान्य माणसांना प्रतिकूल परिस्थितीत  मदतीचा दिलेला हात लोकांच्या कायम स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने आपण उत्तुंग उंचीचा नेता गमावल्याचे दु:ख होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- सत्यजित देशमुख,     सरचिटणीस  प्रदेश काँग्रेस.