Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Sangli › बंद पाईपलाईनने पाणी द्या, तरच शेतकरी आत्महत्या थांबतील

बंद पाईपलाईनने पाणी द्या, तरच शेतकरी आत्महत्या थांबतील

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 8:48PMआटपाडी : प्रतिनिधी

कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आटपाडीचा बंद पाईपलाईनने सर्वांना पाणी देण्याचा ‘आटपाडी पॅटर्न’ राज्यभरात  राबवावा, असे आवाहन डॉ. भारत पाटणकर यांनी केले. यावेळी डॉ. पाटणकर यांनी आटपाडीकरांच्यावतीने केलेला सत्कार लढणारे शेतकरी आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना समर्पित केला.

श्रमिक मुक्तीदल आणि समन्यायी पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीच्या रेट्यामुळे पाणीपट्टीतून 81 टक्के वीजबिलाची सवलत मिळाली. या यशाचा आनंद विजयी मेळावा घेऊन  साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पाटणकर बोलत होते. आनंदराव पाटील, भारत पाटील, अण्णासाहेब पतकी, विजयसिंह पाटील, हणमंतराव देशमुख, जयंत निकम, प्रदीप पाटील, मोहनराव यादव, शलाका पाटणकर, महादेव देशमुख उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले,  अनेक वर्षे वीजबिलाचा बोजा कमी करण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाशी संघर्ष केला. त्यामुळे 81 टक्के वीजबिलात सवलत मिळाली.  आनंदराव पाटील म्हणाले, दुष्काळग्रस्तांना  चळवळीने अंधारातून बाहेर काढले. डॉ.पाटणकर यांनी चळवळीला वाहून घेतल्यानेच हे अभूतपूर्व यश मिळाले.  दरम्यान, मेळाव्यापूर्वी बसस्थानक ते बाजार पटांगणापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर डॉ. पाटणकर यांचा भाजीपाला, फळांची टोपली, बैलगाडीची प्रतिकृती देऊन नागरी सत्कार करण्यात आला. शेतकर्‍यांनी डॉ. पाटणकर, आनंदराव पाटील, भारत पाटील  यांचा सत्कार केला. 

मनोहर विभुते यांनी प्रास्ताविक, परशुराम पवार यांनी सूत्रसंचलन केले.