Sun, Nov 18, 2018 20:22होमपेज › Sangli › ईव्हीएमबद्दल शंका; मनपात गर्दी

ईव्हीएमबद्दल शंका; मनपात गर्दी

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 11 2018 1:22AMसांगली : प्रतिनिधी

मिरजेतील एका प्रभागात ईव्हीएम मशिनद्वारे मतमोजणीत घोटाळा असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आश्रफ वांकर यांनी शुक्रवारी व्यक्‍त केली. त्याचे काही पुरावे असल्याची तक्रार त्यांनी केली. यामुळे महापालिकेत रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. 

याची माहिती मिळताच अनेक पराभूत उमेदवार, नगरसेवक तेथे धावले. याबाबत श्री. वांकर यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे तक्रार केली. श्री. खेबुडकर यांनी याबाबत शनिवारी सकाळी 10 वाजता शहानिशा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे वादावर तात्पुरता पडदा पडला आहे. 

महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे; परंतु यामध्ये ईव्हीएम घोटाळा असल्यासह अनेक तक्रारी, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात न्यायालयातही अनेकांनी धाव घेतली आहे. 

दरम्यान, श्री. वांकर यांनी निवडणूक निकालासंदर्भात ईव्हीएम मशिनचे रेकॉर्ड, बूथनिहाय निकालासह अनेक पुरावे माहिती अधिकाराखाली मागविले आहेत. ते मिळविण्यासाठी आज त्यांनी दिवसभर ठिय्या मारला होता. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात त्यांचा पाठपुरावा सुरू होता. याचदरम्यान त्यांनी मिरजेच्या एका प्रभागात निवडणूक निकाल आणि ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ असल्याचे पुरावे असल्याचा आरोप केला.यावेळी तानाजी रूईकर, नितू चव्हाण आदी उपस्थित होते.

याबाबत नगरसचिव के.सी.हळींगळे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला.परंतु तक्रारदारांचे समाधान झाले नाही. यावेळी गोंधळ उडाला. ही माहिती मिळताच खेबुडकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना तक्रारदारांसमोर ईव्हीएम मशिन तसेच रेकॉर्ड ठेवलेली खोली सील करण्याचे आदेश दिले. तसेच श्री. वांकर यांना याबाबत स्वत: शनिवारी सकाळी समोरच शहानिशा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे श्री. वांकर यांच्यासह सर्वजण तेथून परतले.