Mon, May 20, 2019 20:14होमपेज › Sangli › कवठेमहांकाळ पूर्वभागात दुरंगी लढती

कवठेमहांकाळ पूर्वभागात दुरंगी लढती

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 8:54PMनागज : विठ्ठल नलवडे

कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्वभागातील ढालगाव, दुधेभावी, ढोलेवाडी, शिंदेवाडी, घोरपडी,  कदमवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले. सर्वच गावांमध्ये दुरंगी लढती लागल्या आहेत. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितराव घोरपडे गट यांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या फडात रंगत आणली आहे. ढालगावमध्ये शिवसेनेच्या गटाने भाजपला साथ दिली आहे. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या ढालगाव येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधील  माधवराव जालिंदर देसाई व सविता हरिबा घोदे हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. अन्य प्रभागांमध्ये दुरंगी लढती लागल्या आहेत. भाजप व शिवसेना यांच्या विरोधात अजितराव घोरपडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने दंड थोपटले आहेत. भाजपचे  माजी उपसरपंच  अरविंद स्वामी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेऊन भाजपच्या गटाला जोरदार धक्का दिला आहे.सरपंचपदासाठी भाजपमधून कमल तम्माणा घागरे तर घोरपडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गटातून मनीषा जनार्धन देसाई निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

कदमवाडीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.अन्यत्र भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, घोरपडे  गट असा दुरंगी सामना रंगला आहे. भाजपच्या रूपाली अमित कदम व अर्चना दिगंबर यादव या बिनविरोध निवडून आल्या आहेत.सरपंचपदासाठी भाजपच्या गीतांजली सुनील लिमकर व राष्ट्रवादी, घोरपडे गटातून मीनाक्षी दिलीप खांडेकर नशीब आजमावत आहेत.दुधेभावीत भाजपचे चंद्रकांत हाके यांच्या गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितराव घोरपडे गट यांनी एकत्र येऊन आव्हान उभा केले आहे. सरपंचपदासाठी भाजपमधून संगीता राजाराम काटे तर राष्ट्रवादी काँग्रेस, घोरपडे गटातून करूणा जीवन साबळे यांना निवडणूक रणांगणात उतरवले आहे. दुधेभावीच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शिंदेवाडीत अजितराव घोरपडे गट व भाजप यांच्यात लढत लागली आहे. घोरपडे गटातून आशा गणपत भोसले तर भाजपमधून जयश्री हणमंत लोखंडे निवडणूक लढवत आहेत.ढोलेवाडी, घोरपडी गावात भाजप विरोधात अजितराव घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुरंगी लढत आहे. दोन्ही गटाच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचाराचे रान तापवले जात आहे. या गावांमध्ये थेट सरपंचपदासाठी प्रथमच लढत लागल्याने निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितराव घोरपडे समर्थक एकत्र आल्याने ही निवडणूक म्हणजे ढालगाव विभागात नव्या राजकीय संघर्षाची सुरुवात असल्याचे संकेत मिळत आहेत.