Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Sangli › सांगली श्‍वान पथकातील ‘गोल्डी’चा पुण्यात मृत्यू

सांगली श्‍वान पथकातील ‘गोल्डी’चा पुण्यात मृत्यू

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 11:47PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगलीच्या पोलिस दलाकडील श्‍वान पथकात दहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या ‘गोल्डी’चा पुण्यात प्रशिक्षणादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. दरम्यान, तिचा मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. तिच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लॅब्रोडोर जातीच्या गोल्डीला तिच्या पूर्वीच्या हँडलरने नॉयडा (दिल्ली) येथून खरेदी केले होते. सांगलीतील श्‍वान पथकात मार्चमध्ये तिचा समावेश करण्यात आला. त्यानंतर तिला सांगलीतच प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. ते पूर्ण झाल्यानंतर दोन हँडलरसोबत तिला पुढच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ती पुण्यातच होती. 

काल तिचा अचानक मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याचा अहवाल राखून ठेवला आहे. त्यामुळे गोल्डीचा नेमका कशाने मृत्यू झाला याचे कारण समजू शकले नाही. 

नोयडातून गोल्डीला घेण्यात आले. त्यावेळी पोलिस दलाकडून फक्त 17 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र तिच्या हँडलरने स्वतःकडील वीस हजार रुपये अधिक भरून तिला सांगलीत आणले होते. नोयडातून गोल्डीला आणल्यानंतर एकाच हँडलरसोबत ती होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्या हँडलरची बदली करण्यात आली. नवीन हँडलर तिचा सांभाळ करीत होते. त्याशिवाय ते पुरेसे प्रशिक्षितही नव्हते. त्यामुळेच गोल्डीचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा सुरू आहे.