Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Sangli › डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या हलगर्जीने रुग्णांचे हाल 

डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या हलगर्जीने रुग्णांचे हाल 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 8:26PMकुंडल : हणमंत माळी

पलूस तालुक्यात आरोग्य केंद्रे पुरेशी आहेत. पण डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचे हाल होत आहे. याचा गैरफायदा उठवून खासगी डॉक्टर लूट करीत आहेत. कुंडल व भिलवडी येथे प्रत्येकी  एक   प्राथमिक आरोग्य  केंद्र व  पलूस  येथे एक ग्रामीण रुग्णालय आहे. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत  आंधळी, सांडगेवाडी, बांबवडे,  रामानंदनगर, नागराळे, पुणदी, दुधोंडी, तुपारी, घोगाव ही 9 उपकेंद्र कार्यरत आहेत. 

या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांसह एकूण 37 मंजूर पदे आहेत. त्यापैकी एका वैद्यकीय अधिकार्‍यासह 10 पदे रिक्त आहेत. सावंतपूर उपकेंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे.  

त्याचबरोबर भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत  भिलवडी, खटाव, ब्रम्हनाळ, बुरूंगवाडी, आमणापूर, बुर्ली, अंकलखोप, नागठाणे उपकेंद्रे आहेत.  वैद्यकीय अधिकार्‍यासह 40 पदे मंजूर आहेत यापैकी फक्त 4 जागा रिक्त आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत पलूस तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता आहे. वाढत्या रुग्णांचा ताण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पडत आहे. दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्चअखेर प्रतिसर्प विष लसींचा प्रामुख्याने 20 तर श्वानदंशावरील लसीचा 31 व 40 एवढा  साठा आहे.  कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वर्षात सुमारे 106 महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत.  

भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरात सुमारे 110 महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. रुग्णांना गंभीर अवस्थेत रक्ताची गरज भासल्यात नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचार्‍यांवर वरिष्ठ पातळीवरुन नियंत्रणात त्रुटी आहेत. यामुळे आरोग्य कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतात. 

आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका कार्यक्षेत्राबाहेर रहात असल्याने अत्यावश्यक सेवेच्या कालावधीत रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने रुग्णांना अन्यत्र उपचार घ्यावे लागत आहेत. खासगी रुग्णालयात लुबाडणूक केली जात आहे.