Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › शहरातील मालमत्तांचा फेरसर्व्हे करा

शहरातील मालमत्तांचा फेरसर्व्हे करा

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करा, असे आदेश महापौर सौ. संगीता खोत आणि आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी घरपट्टी विभागाला दिले. महापालिकेच्या उत्पन्‍न वाढीसंदर्भात त्यांनी शुक्रवारी घरपट्टी, एलबीटी, पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. 

ज्या मिळकतदारांनी आपल्या नोंदी घरपट्टी विभागाकडे केल्या नसतील, त्यांना दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिल्याचे श्री. खेबुडकर यांनी सांगितले. ज्या मालमत्ताधारकांना घरपट्टी, पाणीपट्टीची मागणी बिले मिळाली नाहीत त्यांनी लेखी कळवावे, असे आवाहन केले.

  उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते   युवराज बावडेकर, कर संकलक अधिकारी चंद्रकांत आडके, पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये, एलबीटी  अधिकारी, जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद उपस्थित होते . सौ. खोत म्हणाल्या, शहरात अनेक नवीन इमारती, बंगले, अपार्टमेंटची बांधकामे झाली आहेत. काही वर्षे तेथे नागरिक राहतात; पण घरपट्टी विभागाकडे कसलीही नोंद नाही. त्यांना महापालिकेच्या पाणी, स्वच्छतेसह सर्व सुविधा मिळतात; पण नोंदच नसल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडीत आहे. यापूर्वी सूचना केल्या आहेत. तरीही प्रशासन आणि नागरिकांनीही त्याची दखल घेतली नाही. आता हे चालणार नाही. 

या नोंदीसाठी अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे त्यापूर्वी नागरिकांनी नोंद करावी; अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर करू. शिवाय, व्याज, दंडासह कर वसूल केला जाईल. यासंदर्भात कर  संकलक  आडके यांना त्यांनी तशा सूचना दिल्या. एलबीटीचे असेसमेंट आणि पाणीपट्टीचा लेखाजोखाही त्यांनी तपासला. पाणीपट्टी वसुलीसाठीही गती देण्याचे त्यांनी आदेश दिले. प्रसंगी बड्या थकबाकीदारांचे नळ-पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले.