Tue, Apr 23, 2019 21:32होमपेज › Sangli › सत्तेची मस्ती राष्ट्रवादीसमोर दाखवू नका : मुंडे

सत्तेची मस्ती राष्ट्रवादीसमोर दाखवू नका : मुंडे

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 12:02AMतासगाव : प्रतिनिधी 

खासदार संजय पाटील यांनी तासगावात पोलिसांना मारहाण केली. यावरुन येथे कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. खासदार पाटील यांनी सत्तेची मस्ती राष्ट्रवादीसमोर दाखवू नये, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी येथे दिला.

येथील हल्लाबोल आंदोलन सभेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,  विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे - पाटील, आमदार जयंत पाटील,  आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाले,  आमच्यावर शरद पवार यांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही गप्प आहोत. याचा अर्थ आम्हाला काही करता येत नाही, असे खासदारांनी समजू नये. आता सत्ता आमचीच येणार आहे. या सत्ताधार्‍यांचे तर आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लवकरच नीट करू.

यावेळी राष्ट्रवादीच्या  सर्वच नेत्यांनी खासदार पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल तर जशास तसे उत्तर देऊ. तासगावात नगरसेवकास मारहाण केली जाते. पोलिसांवरही हल्ले होतात. चुकीची माणसे सत्तेवर गेली की काय होते, हे जनतेला पहायला मिळते आहे. आमच्या वाट्याला जाऊ नका. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंतच शांत आहे. पण स्व. आर. आर. पाटील यांच्या तासगावात जो प्रकार घडला तो निंदनीय आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.  इथे कायद्याचे राज्य आहे का? सत्ता ही लोकांसाठी असावी लागते. सत्तेच्या माध्यमातून जनहिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे. जयंत पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर हात उचलला, असे आतापर्यंत कधीच घडले नाही. (स्व.) आर. आर. पाटील यांच्या तासगावात असे घडावे, ही दुर्दैवी बाब आहे. पोलिस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या अन्यायाचा हिशोब आमचे शासन आल्यावर चुकता करू. 

Tags : Sangli,  power, NCP,  Dhananjay Munde