Sat, Jul 20, 2019 13:12होमपेज › Sangli › कर्नाटकाप्रमाणे आघाडीचे उशिरा शहाणपण नको

कर्नाटकाप्रमाणे आघाडीचे उशिरा शहाणपण नको

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 10:26PMसांगली : प्रतिनिधी

निवडणूक जिंकण्यासाठी भाजप वाट्टेल त्या थराला  जाऊ शकतो. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महापालिकेत काँग्रेससह सर्व पक्षांनी वेळेवर एकत्र येण्याची गरज आहे.  कर्नाटकप्रमाणे आघाडीचे उशिरा शहाणपण नको, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्‍त केले.  सांगलीवाडीतील मंगेश्वर तालीम संस्थेतर्फे कागवाडचे नवनिर्वाचित आमदार श्रीमंत पाटील  आणि  जयंत पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी  काँग्रेस नेत्या  जयश्री पाटील होत्या. युवानेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बजाज  उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, देशातील व राज्यातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. याची सुरवात महापालिका निवडणुकीपासून झाली पाहिजे.  काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रवादीने काँग्रेस पुढे मैत्रीचा हात केला आहे. त्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा. गोडी गुलाबीने आघाडी व्हावी अन्यथा कर्नाटकसारखी अवस्था होईल तेथे निवडणुकीपूर्वी काँगेस, जेडीएस आघाडी झाली असती तर 150 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या. श्रींमत पाटील म्हणाले, मी राजकारणी नाही. हाडाचा शेतकरी आहे.  शेतकर्‍यांची अवस्था आज बिकट  आहे. शेतीमालाला भाव नाही, सिंचन व्यवस्था नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. शेतकर्‍यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी व माझा कागवाड मतदार संघातील शासकीय कार्यालयात होणारा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी आमदारकीच्या माध्यमातून काम करणार आहे.  

पृथ्वीराज पाटील म्हणाले,  या सत्कार समारंभात सांगलीवाडीकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र आणण्याची किमया केली आहे. यामुळे आघाडीसाठी वातावरण निर्मिती होणार आहे.  नगरसेवक दिलीप पाटील, धनपाल खोत, माजी नगरसेवक हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, महाबळेश्वर चौगुले, सांगली अर्बन बँकेचे संचालक अशोक पवार, नगरसेविका वंदना कदम, बजरंग फडतरे, पाडुरंग भिसे,अमित पारेकर यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहाण्याने निवडणुकीच्या भानगडीत पडू नये

जयंत पाटील म्हणाले, श्रींमत पाटील यांची व माझी स्व. विष्णुअण्णा पाटील यांनी ओळख करून दिली. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांचा निवडणूक हा प्रांत नाही. पण ते निवडणुकीला उभे असल्याचे समजल्यावर धक्काच बसला. कारण आज निवडणूक लढणे तेवढे सोपे नाही. सरळ मार्गी, साध्या माणसाचे हे काम नाही. निवडणूक खर्चाचे आकडे पाहिले की स्पष्ट होते. मतदारांनी उमेदवारांच्या अंगावरील कपडे मागणेच तेवढे बाकी आहे. त्यामुळे शहाण्या माणसाने निवडणुकीच्या भानगडीत पडू नये असे माझे मत आहे.

जय महाराष्ट्र, जय कर्नाटक...!

प्रत्येकांनी भाषणाचा समारोप जय हिंद, जय महाराष्ट्र बरोबरच श्रीमंत पाटील व्यासपीठावर असल्याने जय कर्नाटक अशा घोषणांनी केला.   त्यामुळे  श्रीमंत पाटील म्हणाले, जेव्हा अथणी शुगर कारखान्याचा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याहस्ते  प्रारंभ केला तेव्हा त्यांनीही अशाच प्रकारे घोषणा दिली होती. तोच धागा पकडत निवेदक विजय कडणे म्हणाले, असेच सामंजस्य राहिले तर आता सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सुटायला हरकत  नाही.