Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Sangli › कर्जमाफीचा फायदा अपात्रांना देऊ नका

कर्जमाफीचा फायदा अपात्रांना देऊ नका

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:14AM

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

पीक कर्जमाफीचा लाभ अपात्र लोकांना कदापि देऊ नका, अशा सक्त सुचना बँकांना दिल्या आहेत. अशी चूक जरी झाली तर बँकांना परतफेड करावी लागेल, असा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, दीपक शिंदे - म्हैसाळकर उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पायाभरणी व कोनशिला अनावरण झाले. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व भाजीपाला मंडईचे लोकार्पण करण्यात आले. वॉटर ए. टी. एम., एस. टी. पिक अप शेड, वरचे गल्ली रस्त्यावरील नवीन पुलाचे उद्घाटनही झाले. 

ना. देशमुख म्हणाले, पूर्वी पूर्ण कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र त्याचा फायदा धनदांडग्यांनी घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गोष्टींची खात्री करुनच दीड लाखांपर्यंत गरजूंना कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. या कर्जमाफीचा फायदा अपात्रांना होऊ देणार नाही, असा शब्द देतो. शासनाच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ तासगाव परिसरातील बेदाणा उत्पादकांनी घ्यावा.

ते म्हणाले, खासदार पाटील यांनी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून 1200 कोटी रुपयांचा निधी आणला. त्याचबरोबर तासगावमधून दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. तासगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम खासदार  पाटील यांनी केले आहे.

खासदार पाटील म्हणाले, नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल. त्याचबरोबर नगरपरिषदेचे उत्पन्न वाढेल आणि नागरिकांवरील कराचा बोजा कमी होईल. नगरपरिषदेच्या माध्यमातून बहुसुविधा देणारे रुग्णालय (मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) उभारण्यासाठी 5 कोटी निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे. शहराभोवतीच्या रिंगरोडचे रेंगाळलेले काम लवकरच पूर्ण करुन शहराचा वाहतुकीचा प्रश्‍नही मिटवणार आहोत.

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील म्हणाले, खासदार पाटील हे काम सांगत असताना आत्मियतेने, तळमळीने काम सांगतात त्यामुळे ते काम कमी वेळेत करण्यासाठी प्रेरणा मिळते. पक्षप्रतोद अनिल कुत्ते, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश्‍वर हिंगमिरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप पाटील, नगरसेवक किशोर गायकवाड, अ‍ॅड. सचिन गुजर, दत्तात्रय रेंदाळकर, संतोष बेले, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, दिग्वीजय पाटील, अरुण साळुंखे उपस्थित होते.