Wed, Apr 24, 2019 07:37होमपेज › Sangli › नालेसफाई नाही : प्रशासन फैलावर

नालेसफाई नाही : प्रशासन फैलावर

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 30 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

मान्सूनपूर्व नालेसफाई ठप्प आहे.  तसेच रस्ते-गटारीसह विविध रखडलेल्या कामांवरून महासभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आवश्यक तेथे विनानिविदा कामे करता; मग अत्यावश्यक कामांबाबत अडवणूक का, असा जाब विचारत प्रशासनाला फैलावर घेतले.शहरातील विकासकामे प्रशासनाने अडविली आहेत. त्यामुळे दि.13 मे पूर्वी रखडलेल्या कामांच्या फाईल मार्गी लावाव्यात. त्यासंदर्भात निवडणूक आयोगालाही कळवून त्याची अंमलबजावणी करण्याचा महासभेत ठराव करण्यात आला.

स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे म्हणाले, कुठे कुठे नाले सफाई सुरू आहे त्याचा लेखाजोखा द्या. विष्णू माने म्हणाले, डॉ. आंबोळे थापा मारण्याशिवाय काहीही काम करीत नाहीत. सौ. संगीता खोत म्हणाल्या, नालेसफाई कुठे चालू आहे, ते अधिकार्‍यांना माहीतच नसते. सदस्यांनाही त्याची पूर्वकल्पना दिली जात नाही. एकूणच नाले सफाईच्या नावे प्रशासनाचा पैसे काढायचा धंदाच सुरू आहे. संतोष पाटील म्हणाले, पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप नालेसफाई सुरू नाही. आठ दिवसात नैसर्गिक नालेसफाईचे आदेश व्हावेत. 

गटनेते किशोर जामदार म्हणाले, वर्कऑर्डर नसताना मक्तेदाराने नाले सफाईचे काम परस्पर  सुरू  केले आहे. यावर उपायुक्‍त सुनील पवार यांनी तोंडी आदेशाने हे काम सुरू असल्याचा निर्वाळा दिला.  
जामदार म्हणाले, तोंडी आदेशावर महापालिका चालते का? ठेकेदाराकडून एखाद्या सदस्याने काम करून घेतले तर प्रशासन त्यावर भलेमोठे शेरे मारते. मग या ठिकाणी कसलीही वर्क ऑर्डर नसताना काम कसे सुरू आहे?  पवार म्हणाले, नाले सफाई अत्यावश्यक बाब असल्याने काम आधी सुरू केले. जर मंजुरीशिवाय काम होऊ नये अशीच सभागृहाची इच्छा असेल तर  तसा निर्णय घेऊ. 

शिवराज बोळाज म्हणाले, कोल्हापूर रस्त्यावर ड्रेनेजमुळे भला मोठा खड्डा पडला आहे. तो मुजविण्याचे काम कित्येक महिने  झालेले नाही. नागरिकांचे जीव घेल्यानंतर खड्डा मुजवणार का? यावर अभियंता उपाध्ये यांनी तत्काळ हे काम करू, असे आश्‍वासन दिले. महापौर शिकलगार म्हणाले, ठेकेदाराचा परस्पर शहाणपणा यापुढे चालणार नाही. सदस्यांच्या सूचनेनुसारच नालेसफाई करण्यात यावी. उपमहापौर विजय घाडगे म्हणाले, महापालिकेच्या दोन महिला सफाई कर्मचारी काम करीत नाहीत.

 याबाबत कारवाईचा निर्णय घेतल्यास त्या दोघी स्वच्छता निरीक्षक, मुकादमाविरुद्ध अत्याचाराची पोलिसात खोटी तक्रार देतात.  सदस्य म्हणून आम्ही जाब विचारला, तर माझे नाव टाकून या महिला कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. प्रभागाच्या समस्या मांडायच्या कुणाकडे?  उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, त्या महिला कर्मचार्‍यांबद्दल यापूर्वीही तक्रार झाली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामात शिस्तभंग केल्याप्रकरणी बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आस्थापना विभागाकडे दिला आहे.

विष्णू माने, धनपाल खोत  यांनी दि. 13 मे च्या अध्यादेशानुसार कामे थांबल्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. ते म्हणाले, प्रशासनानेच सहा -सहा महिने कामे थांबविली. त्यात आमची काय चूक? प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कामे प्रलंबितमहापौर हारुण शिकलगार म्हणाले, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. प्रशासनाने कामे मंजुरीसाठी सहा महिने विलंब लावल्याने हा गोंधळ सुरू आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाने 13 मेनंतर कामांच्या वर्कऑर्डर देण्यास मनाई केली तरी ती मंजूर कामे मार्गी लावली पाहिजेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल निवडणूक आयोगाला कळवू. पण ही कामे करून घेऊ.