Wed, Feb 20, 2019 02:27



होमपेज › Sangli › दूध संकलनास मापाची सक्‍ती नको

दूध संकलनास मापाची सक्‍ती नको

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 10:17PM



सांगली : प्रतिनिधी

दूध संस्थांना वजनमापाऐवजी माप पद्धतीने दूध संकलन करणे अशक्य आहे.  त्याशिवाय  दुधाची गुणवत्ता खराब होण्याचा धोका आहे.त्यामुळे मापाने दूध घेण्याची सक्‍ती करू नये, अशी मागणी  सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ आणि संस्था चालकांनी  शनिवारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे   केली. 

जिल्हाधिकारी पाटील यांनी या संस्था चालकांची बैठक घेतली.  तुमचे म्हणणे  सरकारकडे कळवले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी  दिले. बैठकीस महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, थोटे दूध संस्थेचे महावीर थोटे, स्फूर्तीचे किरण मेहता, मधुसूदन डेअरीचे एस. व्ही. कुलकर्णी, चितळे दूध डेअरीचे श्रीपाद चितळे, हुतात्मा दूध संस्थेचे गौरव नायकवडी आदी उपस्थित होते. 

दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. त्यातच  सध्याच्या  खरेदीमध्ये वजन पद्धतीला  विरोध होत आहे.  या पद्धतीने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. 

मापाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने  येथील   वैधमापन कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर राज्य पातळीवर याबाबत दखल घेण्यात आली.  कोणताही द्रवपदार्थ मापामध्ये मोजावा, असा केंद्र शासनाचा नियम आहे. त्यानुसार दूध खरेदी करताना ते मापामध्येच मोजून घ्यावे, असे आदेश शासनाने दिले. यामध्ये शासनाच्या सहनियंत्रक वैधमापन विभागाने दूध संस्थांना इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरण्यास बंदी घातली. त्याची अंमलबजावणीही  सुरू केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर  दूधसंस्था आणि संघाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पाटील यांची भेट  घेतली. 

जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत   दूध उत्पादक संघांनी शासन निर्णय अमान्य असल्याचे सांगितले.  माप पद्धतीने दूध खरेदी करण्यामध्ये वेळ जातो. अंमलबजावणी   अशक्य आहे.  त्याशिवाय  ते न परवडणारे आहे.  मापाने दूध संकलन करताना ते खराब होण्याचा आणि त्याची गुणवत्ता कमी होण्याचा धोका आहे असेही सांगण्यात आले.