Wed, Sep 26, 2018 18:15



होमपेज › Sangli › जि. प. पदाधिकारी बदलासाठी इच्छुकांच्या हालचाली

जि. प. पदाधिकारी बदलासाठी इच्छुकांच्या हालचाली

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:08PM



सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी इच्छुकांच्या हालचालींनी पुन्हा गती घेतली आहे. जत, तासगाव, मिरज   तालुक्यातील भाजप सदस्य तसेच वाळव्याच्या रयत विकास आघाडीने बदलाची मागणी केली आहे. दरम्यान, ‘पदाधिकारी बदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांचा निर्णय अंतिम राहील’, असे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांना सव्वा वर्षे झाली आहेत. सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पाहू, असे नेत्यांनी काही इच्छुकांना सांगितले होते. महापालिका निवडणूक झाल्याने इच्छुकांनी पदाधिकारी बदलाची मागणी पुन्हा उचलून धरली आहे. काही सदस्य व नेत्यांनी बुधवारी पालकमंत्री देशमुख यांची भेट घेतल्याचे समजते.16 ते 19 सदस्यांना हवा बदल!

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ 35 आहे. भाजपचे 23 व भाजप पुरस्कृत 2 (ब्रह्मदेव पडळकर व प्रमोद शेंडगे) सदस्य, शिवसेना 3, रयत विकास आघाडी- 4, अजितराव घोरपडे गट 2 व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1 सदस्य आहेत. सव्वा-सव्वा वर्षाने बदल केल्यास अनेक इच्छुकांना संधी मिळेल, असा मुद्दा उपस्थित करत 35 पैकी 16 ते 19 सदस्यांनी बदलाची मागणी केल्याचे समजते.

जत तालुक्याला हवे अध्यक्षपद

जत तालुक्यातील भाजपचे सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार, स्नेहलता जाधव, रेखा बागेळी, मंगल नामद या पाच सदस्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व खा. संजय पाटील यांना विनंती पत्र दिले आहे. जि.प.च्या विद्यमान पदाधिकार्‍यांची मुदत सव्वा वर्षापेक्षा जास्त झाली आहे. ठरल्याप्रमाणे पदाधिकार्‍यांचे राजीनामे घ्यावेत. जत तालुक्याला अध्यक्षपद द्यावे, असे पत्रात म्हटले आहे. मिरजेचे काहीजण घोरपडेंना भेटले

मिरज तालुक्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माजीमंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली आहे. सव्वा वर्ष झाल्याने पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र देण्याची विनंती केली आहे. घोरपडे गटही पदाधिकारी बदलात संधीच्या अपेक्षेत आहे. मिरज तालुक्यतील भाजपच्या सहा सदस्यांनी पदाधिकारी बदलाची मागणी केल्याची चर्चा आहे

चार तालुक्यांचा वेगळा पवित्राजिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे पलूस व कडेगाव तालुक्याचे भाजप नेते आहेत. उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या पाठिशी शिवसेनेचे सर्व सदस्य आहेत. दरम्यान, नेतेमंडळी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या मागणीपासून पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडीतील भाजप आघाडीचे सदस्य दूर आहेत. 

खा. संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील हे अध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छुक आहेत. तर अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विश्‍वासातील समजले जातात. त्यामुळे बदलाबाबतचा निर्णय औत्सुक्याचा ठरला आहे.

महाडिक भेटले पालकमंत्री सुभाष देशमुख यांना रयत विकास आघाडीतील नेते राहुल महाडिक यांनी बुधवारी पालकमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली. सव्वा वर्ष झाल्याने जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल व्हावा व रयत विकास आघाडीला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. यावेळी खासदार संजय पाटील हेही उपस्थित होते, असे समजते. पदाधिकारी बदलाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. बदल करायचा अथवा नाही याबाबत तेच निर्णय घेतील, असे देशमुख यांनी सांगितल्याची माहिती राहुल महाडिक यांनी दिली.