Fri, Jul 19, 2019 05:00होमपेज › Sangli › मराठा आंदोलनाची जिल्हाभर धग

मराठा आंदोलनाची जिल्हाभर धग

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 10:42PMकडेगाव शहरात कडकडीत बंद  

कडेगाव : शहर प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच मराठा आरक्षणास सरकारकडून होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ शहरात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.   मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी  महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला  नागरिकांनी  उत्स्फूर्त पाठींबा दिला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत  काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने जलसमाधी घेतली. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जल आंदोलन करण्यासाठी  शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी घेतली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांना आदरांजलीवाहण्यासाठी  सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  तसेच मराठा आरक्षणाबाबत शासन वेळकाढूपणा करीत असल्याच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. शहरातील व्यापारी व दुकानदारांनी, विविध संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मोर्चातर्फे आज बैठक

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समितीच्यावतीने कडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला जिल्हा, तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत आंंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

..अन्यथा सगळीकडे उद्रेक होईल

शिराळा : प्रतिनिधी

ऑगस्ट क्रांतीदिनापर्यंत मराठा समाजाला आरक्षण लागू केले नाही तर सर्व मराठा आमदारांना राजीनामे द्यायला भाग पाडू. यातही सरकारने वेळकाढूपणा केला तर सुरू झालेल्या मराठा क्रांती  ठोक मोर्चाला उग्र स्वरूप येऊन सगळीकडे उद्रेक होईल. या सगळ्यास शासन जबाबदार राहील, असा गर्भित इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी शिराळा येथील धरणे आंदोलनावेळी सरकारला दिला.शिराळा येथील तहसील कार्यालयाबाहेर झालेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनादरम्यान ते बोलत होते. सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, रणजितसिंह नाईक, विजयराव नलवडे, राम पाटील हे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजयसिंह महाडिक म्हणाले, आजवर मराठ्यांनी काढलेले मराठा क्रांती मूक मोर्चे जागतिक पातळीवर कौतुकास्पद ठरले. मात्र, सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळे हे दुसरे पर्व ठोक मोर्चाच्या माध्यमातून सुरू झाले आहे. मराठा बांधव आता कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. युवकांचा संयम ढळत चाललेला आहे. सरकारविषयी रोष वाढत चाललेला आहे. यातूनही  9 ऑगस्टपर्यंत वाट पाहू. दरम्यान, जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील.

प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून मोटारसायकल रॅलीने सर्व मराठा बांधव आंदोलनाच्या ठिकाणी आले. तेथे मराठा आरक्षण चळवळीतील हुतात्मा काकासाहेब शिंदे व विजय सोनवणे यांना श्रद्धांजली वाहिली.  विनायक गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, अजय जाधव, सम्राट शिंदे, अभिषेक पाटील, दिग्विजय मोहिते, विकास रोकडे, संदीप चरापले आदींनी मनोगत व्यक्‍त केले. त्यानंतर नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी काहीकाळ रास्ता रोकोदेखील करण्यात आला. देवेंद्र पाटील, महादेव कदम, बंडा डांगे, विश्‍वास कदम, कीर्तीकुमार पाटील, उत्तम निकम, केदार नलवडे, संभाजी नलवडे, आनंदराव पाटील, संभाजी गायकवाड, बाबासो कदम, आण्णासो गायकवाड, शंकर कदम, विनोद कदम, अशोक गायकवाड, पोपट पाटील, अनिता धस यांच्यासह तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. त्यांना  मुस्लिम, ब्राम्हण, मातंग व इतर काही समाजातील बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंब्याचे पत्र दिले. दरम्यान, मंगळवारी (दि. 24) संपूर्ण  शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. प. पू. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी देवून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. 

कुरळप येथे मराठा आरक्षणासाठी गाव बंद

कुरळप : वार्ताहर

कुरळप (ता. वाळवा) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बंदचे आवाहन करण्यात आले  होते. यावेळी सर्व दुकाने बंद ठेवून सर्वच व्यावसायिकांनी या बंदला  प्रतिसाद दिला. संदीप चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आतापर्यंत मराठा समाजाने शांततेने मोर्चे काढले होते. अजूनही मराठा समाजाचा संयम सुटलेला नाही. सरकारने  अंत पाहू नये. यावेळी महाडिक युवा शक्‍तीचे सर्व कार्यकर्ते व मित्रप्रेम ग्रुपचे सर्व सदस्य यांनी गावात फिरून गाव बंदचे आवाहन केले.

भिवघाट  मार्गावर वाहने रोखली, वाहतूक ठप्प

तासगाव : प्रतिनिधी

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. बिरणवाडी (ता.तासगाव) येथे तरुणांनी बुधवारी सकाळी तासगाव - भिवघाट रस्ता रोखून धरला. टायर पेटवून भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने प्राणार्पण केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. काकासाहेब यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी मराठा तरुण रस्त्यावर उतरले आहेत.

बुधवारी सकाळी  भिवघाट रस्त्यावर  सावळज फाटा येथे मराठे जमा झाले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.संतप्त तरुणांनी तासगाव - भिवघाट रस्ता रोखून धरला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती.जोपर्यंत मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार ठोस तोडगा काढत नाही, तोपर्यंत आमच्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच जाईल, असा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला.

सरकारने दखल न घेतल्याने आंदोलन भडकले : खा. गजानन कीर्तीकर

सांगली : प्रतिनिधी

मराठा समाजाने  विविध मागण्यांसाठी शांततेत काढलेल्या मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याने आंदोलन भडकले, असे मत खा. गजानन कीर्तीकर यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्‍त केले. ते म्हणाले, आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. सरकारने त्यांची मागणी लक्ष देऊन पूर्ण करावी. न्यायालयात त्यांची मागणी कशी टिकेल यासाठी प्रयत्न करावेत. पंढरपूर येथे कोणतीही अघटीत घटना घडू नये, यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले नाहीत. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांच्या या कृतीमुळे मराठा समाजाचा अवमान झाला, असे म्हणता येणार नाही. केवळ मराठा समाजातील मुख्यमंत्री व्हावा, यासाठी हे आंदोलन सुरू आहे, असे म्हणता येणार नाही.