Sat, Nov 17, 2018 14:28होमपेज › Sangli › दीर्घ मुदतीच्या थकीत कर्जाला कर्जमाफी द्या

दीर्घ मुदतीच्या थकीत कर्जाला कर्जमाफी द्या

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 11:55PMसांगली : प्रतिनिधी

दीर्घ मुदतीच्या थकीत शेती कर्जालाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ द्या, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केली आहे. पाटील म्हणाले, द्राक्षबाग उभारणी, विहीर खोदाई, पाईपलाईन आदीसाठी घेतलेले दीर्घ मुदतीचे थकित कर्ज कर्जमाफी योजनेसाठी पात्र नाही. जिल्ह्यात सुमारे 20 हजार ते 25 हजार शेतकरी दीर्घ मुदत शेती कर्जाचे थकबाकीदार आहेत. यामध्ये प्रामुख्याने द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. दीर्घ मुदतीचे शेती कर्ज थकित असल्याने ते पीक कर्जापासूनही वंचित राहतात. त्यामुळे शासनाने दीर्घ मुदतीच्या शेती कर्जालाही कर्जमाफी योजनेचा लाभ दिल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळेल.

शासनाने कर्जमाफी योजनेसाठी कुटुंब हा घटक मानला होता.  कुटुंबातील पती, पत्नी व अठरा वर्षाखालील मुले हे एक कुटुंब मानले होते. या कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित थकित कर्ज दीड लाखांपर्यंत असेल तर कर्जमाफी व दीड लाखावर असेल तर ‘ओटीएस’ पात्र होते. मात्र  आता शासनाने कर्जमाफी योजनेंतर्गत लाभासाठी कुटुंबाऐवजी व्यक्ती हा घटक मानन्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आणखी सुमारे 10 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ होण्याचे संकेत आहेत.  ओटीएस अंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरलेल्या काही कुटुंबांना आता व्यक्ती हा घटक केल्याचा लाभ होणार आहे. ‘ओटीएस’अंतर्गत दीडलाखावरील भरलेली थकित रक्कम सुमारे तीनशे शेतकर्‍यांना परत मिळेल, असेही संकेत मिळत आहेत.