होमपेज › Sangli › संचमान्यता नसताना इशार्‍यांचा सिलसिला

संचमान्यता नसताना इशार्‍यांचा सिलसिला

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 10:44PMसांगली : प्रतिनिधी

प्राथमिक शाळांची संचमान्यता राज्यस्तरावर शालेय शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. संचमान्यता अद्याप अंतिम झालेली नाही. ग्रामविकास विभागाकडून मात्र जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांसाठी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत परिपत्रकांचा मारा सुरू आहे. परिपत्रकावर परिपत्रक धाडून कारवाईच्या इशार्‍यांचा सिलसिला सुरू ठेवला आहे. 

शिक्षक संच मान्यता शाळांमधील दि. 30 सप्टेंबरच्या पट (विद्यार्थी संख्या) यावरून होत असते. शासनाने यावेळी सरल प्रणालीचे पोर्टल उशिराने सुरू केले. या पोर्टलवर शाळांकडून माहिती भरण्यात आलेली आहे. दरम्यान शासनाने काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढून संच मान्यतेसाठी दि. 1 जानेवारी 2018 पर्यंतचा पट ग्रहीत धरला जाईल असे स्पष्ट केले. त्यानुसार सरल पोर्टलवर शाळा व विद्यार्थी माहिती शाळा व केंद्रप्रमुख लॉगीनमधून फॉरवर्ड केलेली आहे. मात्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अद्याप संच मान्यता अंतिम करून दिलेली नाही.

राज्यस्तरावरून संचमान्यतेनंतर जिल्ह्याच्या संचमान्यतेवर शिक्षण उपसंचालकांची स्वाक्षरी लागते. त्यांच्या स्वाक्षरीने जिल्ह्याच्या संचमान्यतेचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निघते व त्यानंतर अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू होते. मात्र अद्याप शासनाकडूनच संचमान्यता अंतिम झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक समायोजना प्रश्‍नच उद्भवत नाही. 

जिल्हांतर्गत बदलीसाठी प्रथम अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाचा तगादा सुरू आहे. ‘जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दिलेल्या मुदतीत नियोजनबद्ध पद्धतीने होणे गरजेचे असल्याने संबंधित प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी रोखण्याची कार्यवाही करण्यात यावी’, असे ग्रामविकासच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

मात्र शालेय शिक्षण विभागाने संचमान्यताच अंतिम केलेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍नच नाही. पण ते ‘ग्रामविकास’ला सांगणार कोण? असा प्रश्‍न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.