Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Sangli › फसवा भाजप दोन अंकापर्यंतही पोहोचणार नाही

फसवा भाजप दोन अंकापर्यंतही पोहोचणार नाही

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 05 2018 12:35AMसांगली ः प्रतिनिधी

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने फसवल्याचा जनतेला अनुभव आला  आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत साठ जागा मिळवण्याचे भाजपचे स्वप्न जनताच  धुळीस मिळवेल. त्यांना दोन अंकी संख्येपर्यंतही पोहोचता येणार नाही, असा दावा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. 

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने प्रभागनिहाय जनसंपर्क अभियानाचा  प्रारंभ प्रभाग 15 मधून करण्यात आला. यावेळी महापौर हारूण शिकलगार, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, पक्ष निरीक्षक अभय छाजेड, गटनेते किशोर जमादार, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रा. सिद्धार्थ जाधव, करीम मेस्त्री आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गेल्या पाच वषार्ंत महापालिकेच्या माध्यमातून काँग्रेसने तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त रकमेची विकासकामे केली आहेत . 56 व 70 एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सांगली व कुपवाडचा पाणी प्रश्न सुटणार आहे.  हा काँग्रेसच्या कारकीर्दीतील विकासाचा सोनेरी मुकुट आहे. आम्ही दिलेल्या आश्‍वासनांची वचनपूर्ती केली आहे. उर्वरित कामे करूच. शिवाय  पुढील निवडणुकीचा वचनामा म्हणजे विकासाचा रोडमॅप तयार करू.

ते म्हणाले,खोटी आश्‍वासने देणार्‍या भाजपकडून गेल्या साडेचार वर्षांत जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. विकासासाठी केवळ काँग्रेसचाच पर्याय आहे. देशात व राज्यात आता सत्ता परीर्वतन अटळ आहे. याची सुरुवात सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला रोखून करायची आहे. आमदार गाडगीळ यांनी या निवडणुकीत 20 तरी जागा जिंकून दाखवाव्यात. 

महापौर शिकलगार म्हणाले, महापौर म्हणून गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शहराचा पाणी प्रश्न सोडवला. अविकसित असलेल्या कुपवाड व शामरावनगरला मोठ्या प्रमाणात निधी दिला. शहरात कोट्यवधी रूपये खर्चून रस्ते, गटारी व अन्य विकास कामे केली.

मंगेश चव्हाण यांनी स्वागत केले. त्यांनी या प्रभागातील नगरसेवक शालनताई चव्हाण व किशोर लाटणे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. अभय छाजेड यांनी सांगली महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकेल असा  विश्वास व्यक्त केला. नगरसेवक किशोर लाटणे, आयुब पठाण, नगरसेविका शालनताई चव्हाण, फिरोज महात, रहिम हट्टीवाले, आरती वळवडे, सलमा शिकलगार, अंजुम शेख, सरला कांबळे, सुनिता यमगर, कलावती पवार, सुजाता भोकरे यांच्यासह बिपीन कदम, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.