Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Sangli › जिल्हा नियोजन बैठकीत अधिकारी धारेवर

जिल्हा नियोजन बैठकीत अधिकारी धारेवर

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:29AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीच्या या वर्षातील पहिल्याच सभेत समाजकल्याण, वन विभाग आणि महावितरणाच्या अधिकार्‍यांना समितीच्या सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. या विभागातील अधिकार्‍यांनी निधी खर्चात केलेली दिरंगाई, कामातील कुचराई आणि त्याची खोटी माहिती समितीसमोर सादर केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यामुळे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नव्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाचे उद्घाटन झाले. त्यानंतर समितीची सभा झाली.  खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आदी उपस्थित होते. आमदार शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, मोहनराव कदम, सुमन पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दीपक शिंदे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.

 जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचे आकडे  समोर आल्यानंतर अनेक सदस्य आक्रमक झाले.  वन विभागाने केवळ  11 टक्के निधी खर्च केला आहे. त्यावर प्रस्तावांना मंजुरी बाकी आहे, ते अधिकार जिल्हाधिकार्‍यांकडे आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केला. त्यावर जिल्हाधिकारी  पाटील यांनी या विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावांची कुंडलीच समोर मांडली.   खोटी माहिती दिल्याबद्दल चौकशीची मागणी केली. पालकमंत्र्यांनी तत्काळ त्याला मंजुरी देत चौकशीचे आदेश दिले.

या विभागाकडून पर्यटन विकासात खोडा घातला जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. आमदार नाईक यांनी चांदोली परिसरातील तर आमदार खाडे यांच्यासह सदस्यांनी पेड (ता. तासगाव) येथील पर्यटन केंद्राबाबत बांधकाम विभाग आणि वनविभागाच्या खो-खो पद्धतीवर हल्लाबोल केला. 

जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी सागरेश्‍वर अभयारण्यात लागलेल्या आगीनंतर वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे सांगितले.   या विभागाकडे आग विझवण्याची सामग्री नाही, लोकांना प्रशिक्षण नाही, असलेली सामुग्री वापरली जात नाही, याविषयी संताप व्यक्त केला.   खासदार पाटील यांनी उपविभागीय वनाधिकारी भारतसिंग हाडा यांना विभागाच्या कामात स्वतः लक्ष घाला, अशा सूचना दिल्या. 

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळमधील पिण्याच्या पाणी योजनेचे मीटर स्वतंत्र का बसवले जात नाही, याचा जाब विचारत महावितरणला कोंडीत पकडले. त्यावर उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या अधिकार्‍यांना पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी निर्वाणीचा इशारा दिला. सांगली-मिरज रस्त्याच्या रुंदीकरणात विजेच्या खांबाचा अडथळा दूर केला जात नसल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी धारेवर धरले. जर अपघातात बळी गेला तर थेट गुन्हा दाखल करेन, असा इशारा दिला.

मीटर रिडिंग न तपासता वीज बिले पाठवली गेल्याचा आरोपावर   पालकमंत्र्यांनी जाब विचारताच  अधिकार्‍यांनी त्यात तथ्य असल्याचे सांगितले. रिडिंग घेणार्‍या ठेकेदाराची बिले कशी आदा केली, ती रोखा आणि  शहानिशी करून मगच वसुली करा. तोपर्यंत वीज कनेक्शन तोडू नका, असे आदेश मंत्र्यांनी दिले. शिराळ्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे चार गावांतील 400 एकर गवत जळाल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.