Sat, Nov 17, 2018 14:10होमपेज › Sangli › जिल्हा बँक २१७ शाखांत वीजबिल स्वीकारणार 

जिल्हा बँक २१७ शाखांत वीजबिल स्वीकारणार 

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँक सर्व 217 शाखात वीजबिल भरणा स्विकारणार आहे. बँक नफ्यासाठी वीजबिल भरणा स्वीकारत नाही. उलट त्यामध्ये बँकेला तोशिसच सहन करावी लागते. शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा बँक ही सुविधा उपलब्ध करून देत आहे,  असे  बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी सांगितले. 

ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टिमची अंमलबजावणी व 1.36 कोटी रुपये बँक गॅरंटीस प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत महावितरणने दि. 1 फेब्रुवारी 2018 पासून जिल्हा बँक शाखांमधील वीजबिल भरणा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महावितरणने निर्णय दुरुस्त करत जिल्हा बँकेला वीजबिल स्विकारण्यास कळविले आहे. 

पाटील म्हणाले, वीजबिल स्विकारण्यासंदर्भात जिल्हा बँक व महावितरण यांच्यात दि. 31 मार्च 2016 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत करार झालेला आहे. मध्यंतरी सेंट्रलाईज्ड कलेक्शन सिस्टिमद्वारे वीजबिल स्विकारण्यासंदर्भात महावितरणने कळविले होते. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर प्रथम 23 शाखांमध्ये ही पद्धत सुरू केली. त्यासाठी सर्व्हर, इंटरनेट आणि मनुष्यबळासह सर्व सुविधा उपलब्ध केल्या. त्यानंतर लगेचच ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टिम सुरू करणे व 1.36 कोटी रुपयांची बँक गॅरंटीसाठी महावितरणने बँकेला कळवले. शेतकर्‍यांच्या हितासाठी जिल्हा बँकेने हेही सर्व मान्य केले. महावितरणला तसे कळविले होते. 

पाटील म्हणाले, ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टिमबाबत संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेऊन कार्यवाही सुरू होणार होती. तत्पूर्वीच महावितरणने दि. 1 फेब्रुवारीपासून जिल्हा बँकेतील वीजबिल भरणा बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. महावितरणची हा निर्णय घाईगडबडीतील, चुकीचा होता. महावितरणने चूक दुरुस्त करून जिल्हा बँकेला वीजबिल स्विकारण्यास कळवले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेच्या सर्व 217 शाखात वीजबिल स्विकारण्याची सुविधा सुरू होत आहे.